शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात उभारली जाणार – उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । पुणे । पुढील वर्षांपासून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात उभारली जाईल आणि प्रत्येक वर्षी एका गडावर विद्यार्थ्यांसह हा शासनातर्फे सोहळा साजरा केला जाईल. यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एसएसपीएम विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिवस्वराज्य दिन कार्यक्रमात केली.

श्री.सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीसमोर दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे असावे यासाठी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयातदेखील हा दिन साजरा करण्याला मान्यता दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून महाराष्ट्राला वेग्ळी दिशा दिली, राज्यावरचे संकट दूर केले, देशाला दिशा दिली. अशा राजांच्याप्रति आदराची भावना व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयात शिवशक राजदंड स्वराज्य ध्वज लावल्यास महाराजांच्या कार्याची प्रेरणा महाविद्यातील विद्यार्थ्यांना मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे अराध्य दैवत आहे. त्यांची रणनिती, नम्रतेचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आणि त्यांचे चरित्र्य राज्यातील जनतेसमोर यायला हवे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अमित गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. श्री.सामंत यांच्याहस्ते ५१ फुट उंच शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. कार्यक्रमाला किरण साळी, सौजन्य निकम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!