दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । सातारा । येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उच्च तंत्रज्ञान विभागीय शिक्षण संचालक डॉक्टर राजेंद्र कठरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ उपस्थित होते.
कठरे पुढे म्हणाले, 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 16 महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाअंतर्गत शिव व्याख्याने विविध स्पर्धा महाराष्ट्र गीत राष्ट्रगीत पोवाडे सादरीकरण इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
सातारा शहरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या डॉक्टर बापूजी साळुंखे सभागृहामध्ये सहा जून रोजी सकाळी पारंपारिक पद्धतीने तुतारीच्या निनादात शिव ज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत यांचे सादरीकरण होणार असून शिवकालीन विविध कला व परंपरा यांचेही सादरीकरण केले तसेच विविध स्पर्धा सुध्दा यावेळी घेतल्या जाणार आहेत . या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह सारे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारण केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ यांनी दिली.