
दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील गाळपाविनआ शिल्लक राहिलेल्या उसाचे महसूल व कारखाना विभागामार्फत पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी. शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज व्याजासह रद्द करून या गळीत हंगामातील झालेल्या उसाचे बिल १५ टक्के व्याजासह द्यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक संकाटाशी लढा देत उसाची लागण केली. परंतु, जिल्हा प्रशासनाने गाळपाचे योग्य नियोजन लेखी व तोंडी अनेकदा सांगुनही केले नसल्याने जवळपास ४२ हजार टनापेक्षा अधिक ऊस शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने बंद झाल्याने आता हा ऊस शिल्लक राहिला आहे, त्याचे तात्काळ महसूल विभाग व कारखाना विभाग यांच्या मार्फत पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने एकरी १ लाख रु. मदत देऊन ऊसपिक पिकवण्यासाठी विविध संस्था, सोसायटी, बँका यांच्या मार्फत घेण्यात आलेले पिक कर्जे माफ करुन दुसरे पिक कर्ज देण्याच्या सूचना कराव्यात.
चालू वर्षी गाळपास गेलेल्या ऊसाचे बिल सातारा जिल्ह्यातील तीन ते चार कारखाने वगळता इतर साखर कारखान्यांनी संपूर्ण बिल दिले नाही. नेहमीप्रमाणे ऊस दर नियंत्रण १९६६ चा ३ अ या कायद्याचा भंग केला आहे. अशा सर्व नियम मोडणारे कारखान्यान विरूद्ध कारवाई करुन शेतकऱ्यांना अति तातडीने त्यांनी स्वतः कर्जे घेऊन पिकवलेल्या ऊसाचे पैसे १५ टक्के विलंब व्याजासह देण्यात यावे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास सातारा जिल्हा प्रशासन किंवा संबंधित साखर आयुक्त कार्यालय शिवाजीनगर, पुणे येथे कोणतीही पुर्व कल्पना न देता मागण्या मान्य होईपर्यंत शेतकऱ्यांना बरोबर घेऊन बेमुदत मुक्काम आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, पदाधिकारी अर्जुन साळुंखे, ऍड. विजय चव्हाण, दादासाहेब यादव, मनोहर येवले, रमेश पिसाळ, हेमंत खरात, संजय जाधव, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे, राजू घाडगे, ऊमेश घाडगे, किरण सुर्यवंशी, हिंदुराव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.