व्यसनापासून दूर राहा, कुटुंबाची काळजी घ्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । मुंबई । तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक असून यामुळे संपूर्ण जीवनाचा नाश होतो. यासह कुटुंबसुद्धा उध्वस्त होते. सुदृढ आरोग्य लाभावे यासाठी व्यसनांपासून दूर राहा व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संदेशाद्वारे केले.

सुदृढ आयुष्य आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्त्वाचे आहे. या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त संकल्प करुन व्यसनाला हद्दपार करुन सुंदर आयुष्य सुनिश्चित करुया, असेही आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

आरोग्य विभाग, सलाम मुंबई संस्था, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, नशाबंदी महामंडळ, बेस्ट परिवहन यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागण येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

यावेळी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त शपथ दिली. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.साधना तायडे, सह संचालक पद्‌मजा जोगेवार, उपसंचालक श्री.जाधव, उपसंचालक डॉ.महाले, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक अप्पासाहेब उगले, सलाम मुंबई संस्थेचे प्रदीप पाटील, टाटा हॉस्पिटलचे डॉ. अतुल बुधुख, यासह संस्थेचे पदाधिकारी व मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी जगभर साजरा केला जातो. तंबाखूमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी ‘तंबाखूमुळे आपल्या पर्यावरणाला धोका’ अशी या वर्षाची संकल्पना आहे.

भारत सरकारने 2003 मध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा पारीत करुन यामध्ये सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थांवर नियंत्रण आणले गेले. या कायद्यांतर्गत तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिराती, विक्री, व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वाटप यांचा समावेश आहे. तंबाखू सेवन मुक्ती करिता (National Tobacco Quit Line) तयार करण्यात आलेली असून त्याचा टोल फ्री क्रमांक 1800112356 असा आहे, अशी माहिती या प्रदर्शनात देण्यात आली.

यावेळी विविध संस्थांनी तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम याविषयी पथनाट्य सादर करुन जनजागृतीपर संदेश दिला. तसेच धुम्रपान निषेध क्षेत्रात 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य उत्पादन विकणे हा कायद्याने गुन्हा आहे, शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात कुठलाही तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास कायद्याने बंदी आहे, अशा प्रकारच्या विविध होर्डिंगच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश देणारे फलक या प्रदर्शनात दर्शनी भागात लावण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!