
सातारा- वेदमूर्ती श्रीनिधी धायगुडे व वेदमूर्ती देवव्रत रेखे यांचा मानपत्र देऊन सत्कार करताना वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले ,समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी (छाया : अतुल देशपांडे)
स्थैर्य, 10 जानेवारी, सातारा : श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या 76 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगात वेद पठणामध्ये जागतिक दर्जाचे अलौकिक असे कार्य करणार्या दोन नामवंत वेदमूर्तींचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे हा सत्कार सोहळा झाला .
या सत्कार सोहळ्यापूर्वी कमानी हौद ते समर्थ सदन दरम्यान काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमध्ये श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले,गणपती बुवा रामदासी,ज्येष्ठ समर्थ भक्त रमेशबुवा शेंबेकर रामदासीअशोक गोडबोले , रमण वेलणकर, श्रीकांत शेटे, वेदमूर्ती देवव्रत रेखे यांचे पिताश्री वेदमर्ती महेश रेखे, वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचे समावेत विनयशास्त्री गोडबोले,प्रवीण कुलकर्णी गुरुजी ,राजू कुलकर्णी ओंकार शास्त्री बोडस, दिलीप शास्त्री आफळे ,अतुल शास्त्री आपटे ,प्रकाश शास्त्री करंदीकर सहभागी झाले होते.
सनई ताशांचा सुमधुर सुरात अनेक मान्यवर ब्रह्मवृंद सहभागी झाले होते . श्रीफळ वाढवून या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. सात घोड्यांच्या अतिशय सजवलेल्या अशा शुभ रथात या दोन वेदमूर्तींना बसवण्यात आले होते. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.. जय रघुवीर समर्थ ..जय श्रीराम ..अशा भव्य घोषणांनी परिसर निनादून गेला होत होता. मिरवणूक मोती चौक मार्गे समर्थ सदन जवळील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर येथे आल्यानंतर पिताश्री वेदमूर्ती महेश रेखे , वेदमूर्ती स्वानंद धायगुडे यांच्या हस्ते गोमातांचे पूजन केले .त्यानंतर या दोन्ही वेदमूर्तींचा गुलाब पाकळ्यांची पुष्पवृष्टी करून 7 सुवासिनींनी औक्षण करण्यात आले .आणि यावेळी ..वैदिक हिंदू धर्म की जय ..अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर समर्थ सदन मध्ये सत्काराचा सोहळा प्रारंभ झाला.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर या वेदमूर्तींचा सत्कार व स्वागत योगेश रामदासी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. दीप प्रज्वलानंतर ईशस्तवन सुप्रसिद्ध कीर्तनकार व आकाशवाणी पुणे च्या निवेदिका दीपाताई भंडारे यांनी केले. प्रभागातील नगरसेविका सौ. प्राची शहाणे व धनंजय जांभळे यांनाही कार्याध्यक्ष अच्युत गोडबोले यांनी गौरविले .त्यानंतर प्रभुणे व संतोष वाघ यांनी या दोन्ही वेदमूर्तींची पंचोपचार पूजा करून त्यांना औक्षण केले .
यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी म्हणाले की 9 जानेवारी 1950 रोजी श्रीधर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ सेवा मंडळाची स्थापना होऊन आज 76 व्या वर्धापन साजरा करताना मंडळाने विविध प्रकारे समर्थ वाङ्मयाचे तसेच दासबोध व समर्थ मार्गदर्शक विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे काम विविध उपक्रमातून सुरू ठेवले आहे. समर्थ पादुका दौरा, दासबोध अभ्यासक्रम, समर्थ विद्यापीठ ,शिवथर येथील विविध संस्कार वर्ग याच बरोबर सामाजिक उपक्रमात राष्ट्रीय संकटातही भारतीय पंतप्रधान योजनेला मदत ,पीपी किट, गाईंना चारा, अंध, अपंग शाळांना मदत ,वैदिक पाठशाळांना मदत करत असतानाच आपली ही वैदिक परंपरा टिकावी म्हणून हा उपक्रम आणि उत्तुंग यश मिळवणार्या लहान वयातील या दोन वेदमूर्तीचा सत्कार की ज्यांनी एक वेगळी नवी रेखा निर्माण केली ,त्यांचा गौरव करणे हे मंडळाचे मी भाग्य समजतो. अनेक घटनातून समर्थांच्या मार्गदर्शनावर आणि आशीर्वादावर मंडळ वाटचाल करत आहे, आणि त्याला आपणा सर्वांची साथ अशीच राहू द्यात .
वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे (वय 20 वर्षे) यांनी(श्री शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा दण्डक्रम पारायणकर्ते) दण्डक्रम विक्रमादित्य । दण्डकम त्रिविक्रम। दण्डक्रम वाचस्पति । शुक्लयजुर्वेदालंकार । शुक्लयजुर्वेद हरीशः श्री जगद्गुरु शंकराचार्य यांच्याकडून सुवर्ण कङ्कण प्राप्त । श्री ब्रह्मचैतन्य गुरुकुल द्वारा रजत दण्ड प्राप्त केले आहेत.
तसेच वेदमूर्ती श्रीनिधी स्वानंद धायगुडे (वय 20 वर्षे) यांनी(श्री ऋग्वेद कंठस्थ घनपारायण कर्ते) ऋग्वेद धनसूर्य । त्ऋग्वेद कलानिधी । ऋग्वेद निधी । श्रीकरपात्ररत्न आधी महत्वाचे पठण केले असून या विशेष पदव्या प्राप्त केल्या आहेत.यावेळी सत्कार प्राप्त दोन्ही वेदमूर्तींनी वेदमंत्रांचे पठण करून उपस्थित त्यांना आपल्या अभ्यासाची व पाठांतराची प्रचिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले म्हणाले की ,सातारकरांच्या दृष्टीने आज हा सोन्याचा दिवस आहे .समर्थ रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामींना खूप आनंद झाला असेल .वयाने लहान असतानाही उत्तुंग यश व कौतुक मिळवणार्या वेदमूर्ती श्रीनिधी धायगुडे व वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी नेमके काय केले, हे सर्वांना जाणून घ्यायची इच्छा आहे. कंठस्थ अध्ययन करताना वेदांचे पदपाट, कर्म पाठ, आणि जटा,माळा, शाखा ,रेखा अशा आठ विकृती म्हणजेच विशेष कृतीत वेदपठण पूर्ण अध्ययन बारा वर्षे केले असून हे वेद कंठस्थ होणे खूप अवघड आहे .वेदो नारायण यांना म्हटले जाते . मंत्र पठण हे कायमस्वरूपी त्यांचे सोबत आहे .वेद हे परमेश्वराचे प्रश्वास आहेत. त्यात अहंकाराचा वाटा नाही, असे वेदमंत्रज्ञानी जतन नव्हे तर संस्कार पूर्ण केले .मूलमंत्र सविता जपली .मंत्र सिद्ध झाल्यावर यांची वाणी खरे होत आहे बोलेल ते खरे होईल .असे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले आहे .आणि खरोखरच त्यांच्या वाणीत दररोज 16 ते 18 तास अखंड खडतर तपश्चर्या करून त्यांना मिळालेली ही फलश्रुती आहे. या दोघांचे नाते हे आते – मामे भावंडांचेअसून यांचे आजोबा पं. शिवराम शास्त्री धायगुडे यांचे महान स्वप्न होते की, विश्वात कीर्ती मान ठरेल असे स्वप्न या नातवांनी पूर्ण केलेले आहे .याचा विशेष आनंद होत आहे.माझा देश आणि माझा धर्म हा मोठा व्हावा जगाचे नेतृत्व त्यांनी करावे हीच ध्येयशक्ती पुढे ठेवून असे महापुरुष निर्माण होण्यासाठी ही वेद परंपरा महत्त्वाचे आहे .
यानंतर मानपत्राचे वाचन मुग्धा बिवलकर यांनी केल्यावर विविध संस्थांच्या वतीने या दोन्ही वेदमूर्तींना गौरवण्यात आले. यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण संघ, पंचपाळे हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट, वि.ना .लांडगे ट्रस्ट,ब्राह्मण महासंघ, भक्त धाम, राम ध्यान मंदिर ट्रस्ट, अर्कशाळा सातारा. नारीशक्ती फाउंडेशन ,दासबोध अभ्यास मंडळ तसेच काही वैयक्तिक व्यक्तींनीही त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी आशीर्वचन देताना महेश रेखे ,स्वानंद धायगुडे यांनी या सत्कार सोहळ्याचे कौतुक करताना ,आमच्याकडे शब्द नाहीत .सातारकरांनी जे प्रेम दिले ते खरोखरच अवर्णनीय आहे .वेदांची व गुरूंची कृपा झाल्यामुळेच हे यश या दोन वेदमूर्तींना .. आले असे सांगून वेदांच्या रक्षण व धर्म प्रसारणासाठीच आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले .
यावेळी कार्याध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर पेंडसे यांनी केले.कल्याणकारी रामराया.. या रवींद्र नरेवाडीकर यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास गणपती बुवा रामदासी,चिंतामणी शास्त्री नातू ,विनयशास्त्री गोडबोले,प्रवीण कुलकर्णी गुरुजी ,राजू कुलकर्णी ओंकार शास्त्री बोडस, दिलीप शास्त्री आफळे ,अतुल आपटे ,प्रकाशशास्त्री करंदीकर यांचे सह ब्राह्मण महासंघाचे धनंजय कुलकर्णी ,राज माजगावकर, श्रीराम सबनीसअविनाश लेवे, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

