विडणीजवळ उसाच्या शेतात महिलेचा अर्धवट मृतदेह; नरबळीचा संशय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ जानेवारी २०२५ | फलटण |
विडणी (ता. फलटण) परिसरातील २५ फाटा येथील उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाजवळ उसाच्या शेतात गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली आढळून आल्याने हा नरबळी दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फलटण तालुक्यातील विडणी येथील २५ फाटा परिसरात प्रदीप जाधव यांच्या उसाच्या शेता काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित मृतदेह अर्धवट व सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हिंस्र प्राण्यांनी कबरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून बाहेर ओढून आणला तेव्हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

विडणीच्या पोलिस पाटील शीतल नेरकर यांनी या घटनेची माहिती फलटण पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलिस उपनिरीक्षक मच्छींद्र पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली.

या प्रकारामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

विडणी येथे मृतदेह आढळलेल्या परिसरात नारळासह इतर साहित्य आढळून आले आहे. उसाच्या शेतात काही अंतरावर नारळ, गुलाल, महिलेचे केस कापलेले, तेलाचा दिवा, काळी बाहुली, सुरी आढळून आली. तसेच ३०० मीटरच्या परिसरात कवटी आढळून आली आहे. मृत महिलेचे कंबरेपासून खालचे धड़ वेगळे होते. त्यामुळे हा प्रकार नरबळी असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळाचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख यानी शुक्रवारी सायं सहा वाजता भेट दिली. तसेच अधिकार्‍यांना तपास संबंधी सूचना केली. श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून मृतदेहाचे शवविच्छेदन जाग्यावरच करण्यात आले.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा बोलविण्यात आला होता. येथे जवळपास ९-१० एकर उसाचे क्षेत्र असून पोलिसांनी मृतदेहाचा बाकीचा भाग, इतर पुरावा मिळण्यासाठी परिसर पिंजून काढला. पुरावा शोधण्यासाठी आसपासचा ऊस तोडण्यासाठी संबंधित कारखान्यास सूचना केल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!