
स्थैर्य, सातारा, दि.29 ऑक्टोबर : राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि सातारा जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेक एक नोव्हेंबरपासून (शनिवार) सुरू होत आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते.
निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे. वासोट्यावरून दिसणारे उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दर्या मनात धडकी भरवतात. वासोटा पर्यटन सुरू होत असल्यामुळे या भागातील मुनावळे, बामणोली शेंबडी, तापोळा, अंबवडे येथील बोट क्लब चालकांमध्ये, तसेच स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरणआहे. वासोट्याला जंगल ट्रेकिंगसाठी जाताना बामणोलीवरून किंवा मुनावळे, दत्त मंदिर या ठिकाणांहून बोटीने जावे लागते. बोटीने उतरल्यावर पायथ्याशी घनदाट जंगल आहे. याच जंगलात एक ’वाघ’ म्हणजेच वासोटा किल्ला ठाण मांडून बसलेला आहे. अशा या किल्ल्याला एकदातरी भेट देऊन तेथील वैभव अनुभवले पाहिजे. वासोटा गड हा महाराष्ट्रातील दुर्ग व निसर्गप्रेमी यांचे नेहमीच आकर्षण ठरला आहे.
वासोटा दुर्ग पर्यटनाकरिता सातारा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनपरिक्षेत्र बामणोली येथे पर्यटकांना जाणेकरिता स्थानिक बोट क्लबमार्फत बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. दुर्ग पर्यटनकरिता पर्यटकांना निसर्ग मार्गदर्शक सोबत नेणे आवश्यक असून, वासोटा दुर्ग पर्यटन मार्ग प्रवेशापासूनच प्लॅस्टिक मुक्त झोन असून, प्लॅस्टिकच्या वस्तूंवर पूर्णपणे बंदी आहे.
वासोट्याच्या पायथ्याला पोहचल्यावर घनदाट जंगल असल्याने सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जमिनीची ओलही लवकर कमी होत नाही. परिणामी जळूचे (कानीट) प्रमाण जास्त असते. हा कीटक पायाला लागल्यावर रक्त पितो व आपोआप गळून पडतो, त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्र पर्यटकांना पर्यटनाकरिता खुले करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात स्थित असलेला वासोटा व्याघ्रगड या ट्रेकचा दुर्गप्रेमींना आनंद घेता येणार आहे.– तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.
असे असेल प्रवेश शुल्क..
कॅमेरा शुल्क डीएसएलआर लेन्स कॅमेरा 100 रुपये,साधा कॅमेरा, पॉइंट शूट कॅमेरा 50 रुपये,100 रुपये प्रती व्यक्ती,12 वर्षांच्या आत 50 रुपये,गाइड 250 रुपये,बोट/वाहन शुल्क 150 रुपये.
