दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । सातारा। श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून २८ जून ते ४ जुलै २०२२ या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. सोहळ्याची तयारी प्रशासनातर्फे वेगाने सुरू असून वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची विविध विभागांना जी कामे करण्यास सांगितली आहे ती कामे २० जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
संत ज्ञानेश्वर पालखी सोळ्यानिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांसाठी लोणंद येथील निरा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका निरा स्नानासाठी जाणारा रस्त्याचे बॅरिकेटींग व दत्त घाटावरील स्वच्छता करण्यात येत आहे.
दत्त घाट, निरा नदी, पाडेगाव ते पालखी तळ लोणंद या पालखी मार्गावरील सर्व खड्डे बुजवणे, साईडपट्टी भरुन घेवून व रस्त्याच्या बाजुची काटेरी झुडपे काढण्याबरोबर स्वच्छतेची कामे देखील करण्यात येत आहे. पालखी तळ लोणंद येथे मुरुम टाकून त्याचे सपाटीकरण व रोलींग करण्यासोबत पालखी तळावर स्नानगृह, धोबी घाट व स्वच्छता गृह उभारण्यात येणार असून त्याची वेळोवेळी स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.. याचबरोबर फिरत्या शौचालयाची व्यवस्थादेखील करण्यात येत आहे. या शौचालयांना तात्पुरती वीज जोडणी देण्यात येणार आहे. पालखी तळावर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून नियंत्रणकक्षात 24 तास अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील.
पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून पिण्याचे पाण्याच्या स्त्रोताचे आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर पालखीचा फलटण मुक्कामासाठी मुख्य रस्ता ते विमानतळ (पालखी तळ) या मार्गावरील रस्त्याची डागडुजी, पालखी तळावर पालखी येण्यापूर्वी स्वच्छता, पालखी तळावर पुरेशी तात्पुरती शौचालये, शौचालयाच्या ठिकाणी पाणी आदी सुविधा करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची कमतरता होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यासाठी नगर पालिका हद्दीतील ८ फीडिंग पॉईंटमधून शासकीय व खासगी टँकरद्वारे पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
पालखी तळावर महिलांसाठी स्नानगृह उभे करण्यात येत आहे. विसाव्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यापासून प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी रस्ता रॅम्प तयार करण्यात येत आहे. पालखी मार्गावरील व मुक्कामाच्या ठिकाणी विजेचे खांब, तारा यांची तपासणी, पालखीच्यावेळी खासगी वाहतुकीचे नियंत्रण करण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या व भाविकांच्या सोईसाठी ठिकठिकाणी पुरेशी आरोग्य व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.