दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । वाढे ता. सातारा येथील सोसायटीत सभासदांची फसवणूक आणि विश्वासघात करुन सुमारे साठ लाख रुपयांचा अपहार केला आहे. याबाबतची सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात दिल्यानंतर गुन्हा नोंद करुन सचिवाला अटक झाली आहे. हा प्रकार लेखा परीक्षणात उघड झाला आहे. याप्रकरणी प्रमाणीत लेखा परीक्षक दत्तात्रय जयसिंगराव पवार रा. पारगाव खंडाळा यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर सचिव राजेंद्र भानुदास चव्हाण रा. फडतरवाडी, ता. सातारा याच्यासह अन्य एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
एप्रिल २०१६ पासून ३१ मार्च २०२० या कालावधीत वाढे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत हा प्रकार घडला आहे. स्वत:च्या लाभासाठी पदाचा गैरवापर करुन जाणीपूर्वक खोट्या नोंदी केल्या. त्याचबरोबर रोख शिल्लक चुकीची दर्शवून कर्जदाराचा जमा बँकेत ठेवला नाही. स्वत:च्या लाभात ठेवून संस्था आणि सभासदांची ५९ लाख ९१ हजार ९७० रुपयांची फसवणूक करुन विश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, सोसायटीतील हा अपहार लेखा परीक्षणात समोर आला. त्यानंतर गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे करीत आहेत.