दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । लोणंद । कोणी भाड्याने का होईना आम्हाला कोण घर देते का घर ’ , अशी आर्त हाक देत गोपाळवस्तीतील डोंबारी समाजातील बांधव गुरूवारी लोणंदमधील गल्लीबोळात भाडोत्री घर शोधत होते. पण, या लोकांना कोणीच जवळ करताना दिसत नव्हते. पुणे मिरज लोहमार्गावर खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील शास्त्री चौकांमध्ये लोणंद-सातारा रोडच्या पूर्वेस असणार्या नजीकच्या रेल्वेच्या जागेच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या या वडार, डोंबारी, घिसाडी, गोपाळ समाजातील बांधवांच्या गोपाळवस्तीतील पक्की व साध्या घरांची अतिक्रमणे रेल्वे प्रशासनाने दुपारी काढली. पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण व रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने गेल्या चार वर्षांपासून नीरा येथील रेल्वे लाईनच्या रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करून घरे उभारलेल्या डोंबारी बांधवांना नोटिसा देत जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अतिक्रमित असलेल्या घरांवर लाल रंगाच्या खुणा करून अंतिम नोटिसा चिटकविण्यात आल्या होत्या व अतिक्रमणे काढण्याची अंतिम तारीख दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून वडार, डोंबारी, घिसाडी, गोपाळ समाजातील गोपाळवस्तीतील बांधवांची घरातील साहित्य दुसरीकडे ठेवण्याची धावपळ सुरू होती. तात्पुरते केलेले पत्र्याचे शेड, दरवाजे, खिडक्या, लोखंडी अँगल, लाकूडफाटा जे पुढे उपयोगी पडेल, असे साहित्य घेऊन हे लोक गाव परिसरात मिळेल त्या ठिकाणी पर्यायी जागा शोधत होते. तर काहीजण भाडोत्री घर शोधत होते. अखेर रेल्वेचे सीनिअर सेक्शन इंजिनीअर यांच्या नेतृत्वाखाली 20 कर्मचारी, रेल्वे पोलीस निरीक्षक, पोलीस, स्थानिक पोलीस यांच्या उपस्थितीत दोन जेसीबी, एक ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मदतीने गोपाळवस्तीतील अतिक्रमित घरे अतिक्रमित घरांच्या अर्धवट राहिलेल्या भिंती भुईसपाट करण्यात आल्या.
यापूर्वी 2018 साली रेल्वेकडून लोणंद रेल्वे स्टेशनच्या बाजूला नवीन पॉवर स्टेशन साठी रेल्वेच्या हद्दीत दक्षिण दिशेला असलेल्या बेघर वस्तीसह आंबेडकर वसाहत, रोटरी गार्डन शेजारील झोपडपट्टी तसेच बस स्थानक आणि रेल्वे स्टेशनच्यामध्ये असलेली झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यावेळेस सुमारे अडिचशे कुटूंबे विस्थापित झालेली तर यावेळेस जवळपास शंभर कुटूंबे उघड्यावर पडली आहेत.