दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लशीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.
मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समूह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा बुस्टर डोस घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.