दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । नागपूर । केंद्रातील मोदी सरकार संविधानातील धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आर्थिक स्वातंत्र्य आणि संघराज्य या चार स्तंभावर आघात करत धार्मिक ध्रुवीकरण तीव्र करत आहे. ही अवस्था अत्यंत धोकादायक आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यातील समन्वय संपुष्टात आणून संघराज्य संकल्पनेला मूठमाती देत असल्याची प्रखर टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांनी केली.
यावेळी पुढे बोलताना माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी म्हणाले की, देशात पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सी.ए.ए., एन.आर.सी., एन.पी.आर. लागू करू पाहत आहे. दलित, अल्पसंख्याक, आदिवासींना लक्ष्य करत आहेत. सार्वजनिक उद्योग धंद्याचे खाजगीकरण करून रोजगाराची साधने हिरावून घेऊन आर्थिक स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. तसेच “सांप्रदायिकतेच्या जोरावर राजकीय सत्ता काबीज करणाऱ्या भाजपप्रणित मोदी सरकारला गाडण्यासाठी सर्व वामपंथी विचारधारांनी एकत्र यायला हवे तरच आपण भारत देश वाचवू शकू. वैचारीक आणि सैद्धांतिक भूमिका घेऊनच नवा भारत घडवता येईल.” असे येचुरी यांनी सांगितले. दरम्यान नागपूर येथील जवाहर विद्यार्थी वसाहतीगृहातील लांजेवार सभागृह येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते लाल झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी शहिद स्तंभाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गदर कलापथक कलाकारांनी क्रांतिगीते सादर केले. यावेळी जोरदार घोषणानी परिसर दणाणून गेला. यानंतर सर्व प्रतिनिधी रॅलीद्वारे देशपांडे सभागृह येथे पोचून स्वागत सत्राला सुरुवात झाली.
याप्रसंगी व्यासपीठावर अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष विजय जावंधीया, माकपचे पॉल्यूट ब्युरो सदस्य माजी खासदार निलोत्पल बसू, माकपचे केंद्रीय सचिव मंडळ सदस्य डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव कॉ. नरसय्या आडम मास्तर, केंद्रीय समिती सदस्य मरियम ढवळे, माजी आमदार जीवा पांडू गावित, आमदार कॉ. विनोद निकोले, राज्य सचिव मंडळ प्रा. उदय नारकर, शेकाप चे नेते प्रा. एस. व्ही. जाधव, नागपूर जिल्हा सचिव अरुण लाटकर, तुकाराम भस्मे, राजू कोंडे आदी उपस्थित होते.