मुधोजी महाविद्यालयात प्रयोगात्मक ‘अभिरूप निवडणूक प्रक्रिया’ उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राज्यशास्त्र विभाग आणि निवडणूक साक्षरता क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “अभिरुप निवडणूक प्रक्रिया” या प्रयोगात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभागाची प्रात्यक्षिक अनुभवण्याची संधी मिळाली.

या उपक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तीन वेगवेगळे पक्ष स्थापन केले होते.
१. बी.ए. भाग १ : ‘दे धक्का’ पक्षाचे उमेदवार सिद्धांत निकाळजे
२. बी.ए. भाग २ : ‘आम्ही सगळे एकत्र’ पक्षाचे उमेदवार श्रुती जगताप
३. बी.ए. भाग ३ : ‘जगा आणि जगू द्या’ पक्षाचे उमेदवार मयूर बनकर

निवडणूक प्रक्रियेचा तपशील :

  • एकूण मतदारसंख्या : ५४८
  • विद्यार्थी मतदार: ४४७ (३५८ विद्यार्थिनी व १३५ विद्यार्थी)
  • प्राध्यापक व कर्मचारी मतदार: १०१

निकाल :

  • सिद्धांत निकाळजे : २६८ मते
  • मयूर बनकर : १८१ मते
  • श्रुती जगताप : ७९ मते
  • २० मते बाद ठरली.

सिद्धांत निकाळजे यांनी ८७ मतांच्या फरकाने विजयी होऊन निवडणूक जिंकली.

मतदान केंद्राच्या व्यवस्थापनात विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केंद्रप्रमुख म्हणून जय जाधव, मतदान अधिकारी म्हणून सोहम धुमाळ, निकिता गायकवाड, साक्षी कदम, पोलीस शिपाई म्हणून नम्रता लोखंडे, प्रिया बोराटे, करण राऊत यांनी काम पाहिले.

यावेळी फलटण नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ८ च्या पाचवीतील विद्यार्थिनींनी अमोल खंकाळ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया पाहून शिकण्याचा अनुभव घेतला.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांचे मार्गदर्शन लाभले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच प्रा. गिरीश पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. प्रा. अक्षय अहिवळे आणि प्रा. प्रियांका शिंदे यांनीही या उपक्रमात मोलाची साथ दिली.

या प्रयोगात्मक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व समजून घेण्याची आणि निवडणूक प्रक्रियेतून शिक्षण घेण्याची संधी मिळाली.


Back to top button
Don`t copy text!