
दैनिक स्थैर्य । 26 जून 2025 । बारामती । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. 21 पैकी नीलकंठेश्वर पॅनलने 20 जागा जिंकल्या तर सहकार बचाव पॅनलला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. सहकार बचाव पॅनलचे प्रमुख ज्येष्ठ सहकारतज्ञ चंद्रराव तावरे यांचा विजय झाला; मात्र सहकार बचाव पॅनलचे 19 उमेदवार पराभूत झाले. प्रतिष्ठेच्या लढाईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारल्याने तावरे गटाला मोठा धक्का बसला. अजित पवार स्वतः तळ ठोकून राहिल्याने विजय शक्य झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले होते. आपणच चेअरमन होणार हे जाहीर करत त्यांनी निवडणुकीची रणनीतीआखली होती. त्यानुसार त्यांनी कामकाज केले. माळेगाव परिसरात तब्बल 12 सभा घेतल्या. सर्व यंत्रणा कामाला लावली. कार्यकर्ते, पुढारी, नागरिक, पदाधिकारी यांच्या संपर्कात राहून त्यांनी ही निवडणूक हाताळली. छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेत अजित पवार यांनी या निवडणुकीत कोणतीही कसर सोडली नाही.
सर्वांशी संवाद साधत वेळोवेळी बदल करत मायक्रो प्लॅनिंग केले. चेअरमन पदाच्या उमेदवारीने नीलकंठेश्वर पॅनलला आश्वासक चेहरा मिळाला. त्यामुळे ते यश संपादन करू शकले. माळेगावची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. राज्याचे लक्ष या निवडणुकीने वेदले होते. प्रतिष्ठेच्या लढाईत दणदणीत विजय मिळवत अजित पवार बाजीगर ठरले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक त्यांच्याच निळकंठेश्वर पॅनलने विजय मिळवला. न राज्यात उपमुख्यमंत्रिपदावर कार्यरत असतानाही अजित पवार यांना सहकाराची निवडणूक का लढवायची आहे असा प्रश्न करीत रंजन तावरे यांनी निळकंठेश्वर पॅनेलविरोधात सहकार बचाव पॅनेल उभा करू शड्डू ठोकला होता. मात्र मतदारराजाने त्यांना साथ दिलेली नाही. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा 362 मतांनी धक्कादायकरित्या पराभव झाला. रंजन तावरे यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांच्या समोर तुल्यबल प्रतिस्पर्धी होते. सहकारमहर्षी चंद्रराव अण्णा तावरे यांनी वयाच्या 85 व्या वर्षीही कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनेलच्या विरोधात शड्डू ठोकला होता. चंद्रराव अण्णांना रंजन तावरे यांची खंबीर साथ होती. दोघांनी मिळून बारामती-माळेगाव परिसरात सभांचा धडाका लावून अजित पवार यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला होता. अगदी विधानसभेची निवडणूक भासावी, असा प्रचार कारखान्याच्या निवडणुकीत दो केला गेला. शरद पवार यांच्या विचारांचा पॅनेलही निवडणूक लढत होता. अजित पवार याच्या निळकंठेश्वर पॅनेलला मतदारांनी प्रतिसाद दिला. अजित पवार यांच्या पॅनेलविरोधात सहकार बचाव पॅनेलतर्फे रंजन तावरे निवडणूक लढत होते. गेल्या दोन तीन आठवड्यांपासून त्यांनी गावोगावी जाऊन धुमधडाक्यात प्रचारही केला होता. मात्र मतदारांनी त्यांना नाकारले.
अजित पवार यांची रणनीती यशस्वी
माळेगाव कारखान्याची निवडणुकीत सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून गुरु शिष्याच्या जोडीने झंजावात निर्माण केला होता. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील तळ ठोकून थांबावे लागले होते. मात्र अजित पवार यांच्या रणनीतीपुढे गुरु शिष्यांच्या पॅनलला पराभवांना सामोरे जावे लागले.
आमचा चेअरमन अजितदादा
सांगवीला सांगा, माळेगावला सांगा आमचा चेअरमन अजित दादा, एकच वादा अजित दादा अशा प्रकारच्या घोषणा देत अजित पवार समर्थकांनी जल्लोष साजरा केला. नीलकंठेश्वर पॅनलची सरशी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फटाके फोडले तसेच गुलालाची उधळण करत घोषणाबाजी करत जल्लोष केला. दि. 24 रोजी निळकंठेश्वर पॅनलला आघाडी मिळणार होती. मात्र आज दुसर्या फेरीच्या मतमोजणीनंतर विजय दृष्टिक्षेपत आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली.
माळेगाव, सांगवी, बारामती गटात चुरस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलने माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत बाजी मारली असली तरी देखील माळेगाव, सांगवी व बारामती गटात चुरस निर्माण झाली होती. माळेगाव गटात सहकार बचाव पॅनलचे रंजनकुमार तावरे यांचा पराभव झाला मात्र माझी चेअरमन बाळासाहेब तावरे व रंजन तावरे यांच्यात रस्सीखेच झाली. त्यामुळे माळेगावात काय होणार याची उत्सुकता सर्वांना होती.बाळासाहेब तावरे यांनी विजय मिळवला.
सांगवी गटात देखील सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे व नीलकंठेश्वर पॅनलचे विजय तावरे तसेच खलाटे यांच्यात यांच्यात रस्सीखेच झाली. मात्र चंद्रराव तावरे यांची आघाडी कायम राहिली. त्यांनी विजय संपादन केला. बारामती गटात निलकंठेश्वर पॅनलचे नितीन सातव व सहकार वाचवा पॅनलचे नेताजी गवारे तसेच जी. बी. गावडे यांच्यात राहिली. अखेरच्या क्षणी नितीन सातव यांनी बाजी मारली.