माणचा सभापती भाजपचा की राष्ट्रवादीचा ? 

 सोमवारी  फैसला : चिठ्ठीतून की फोडाफोडीच्या राजकारणातून निकाल?


 स्थैर्य, 15 मार्च, सातारा : माण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरु झाली असून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी पाच सदस्य असल्याने सोमवारी (ता.१६) होणारी सभापती निवड चिठ्ठीवर जाणार की फोडाफोडीच्या राजकारणातून निकाल लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे सभापती भाजपचा की राष्ट्रवादीचा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माण पंचायत समितीचे सभापती पद खुले असल्याने कोणत्या पक्षाचा उमेदवार सभापती होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. पंचायत समितीत भाजपकडून आंधळी गणातून अर्जुन काळे, मलवडी गणातून बाळासाहेब कदम, वावरहिरे गणातून राजाराम बोराटे, पळशी गणातून डॉ. राजेंद्र खाडे आणि बिदाल गणातून सौ. उषा भोसले हे पाच सदस्य निवडून आले आहेत.
माण पंचायत समितीचे नवीन प्रशासकीय भवन बांधकाम गेली तीन वर्षे सुरू असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. जुनी इमारत धोकादायक झाल्याने ती बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंचायत समितीचा कारभार तात्पुरत्या जागेत सुरू आहे. सोमवारी सभापती आणि उपसभापती निवड होणार असताना नव्या पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी योग्य कार्यालय उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जुन्या इमारतीलगत असलेल्या वाहनतळाच्या शेडमध्येच तात्पुरत्या स्वरूपात सभापती आणि उपसभापतींसाठी खोल्या तयार करण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मार्डी गणातून प्रियांका जगदाळे, वरकुटे-मलवडी गणातून विक्रम शिंगाडे, कुकुडवाड गणातून विद्या काटकर, गोंदवले बुद्रुक गणातून गौरी तुपे आणि वरकुटे-म्हसवड गणातून कल्पना वीरकर हे सदस्य विजयी झाले आहेत. भाजपकडून गटनेता म्हणून अर्जुन काळे यांचे नाव पुढे येत असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रियांका जगदाळे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र सभापती पद खुले असल्याने सर्व सदस्यांना संधी असल्याचे बोलले जात आहे.
भाजप नेते आ. जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने राजकीय करिष्मा दाखवला आहे, त्याच धर्तीवर माण तालुक्यातही राजकीय घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख आणि अनिल देसाई कोणती भूमिका घेणार आणि कोणाला उमेदवारी देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दहा सदस्य असलेल्या माण पंचायत समितीत दोन्ही पक्षांचे प्रत्येकी पाच
सदस्य असल्याने सभापती आणि उपसभापती निवड चिठ्ठीवरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माण पंचायत समितीच्या सभापती निवडीचा यापूर्वीही दोन वेळा चिठ्ठीवर निकाल लागला आहे. सुमारे १९ वर्षापूर्वी २००७ मध्ये ना. जयकुमार गोरे आणि अनिल देसाई हे दोघे काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचे जगन्नाथ जाधव हे चिठ्ठीवर सभापती झाले होते. त्यावेळी विजय बनसोडे हे उपसभापती झाले होते. त्यानंतर अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर २०१२ मध्येही सभापती निवड चिठ्ठीवर झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीराम पाटील सभापती झाले, तर अनिल देसाई यांचे मामेभाऊ वसंतराव उर्फ पिंटू जगताप उपसभापती झाले होते. दोन्ही वेळा अनिल देसाई ज्या पक्षात होते, त्या पक्षाचा विजय झाला होता.


Back to top button
Don`t copy text!