दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । लोणंद । सध्या पुणे ते मिरज दरम्यान जुन्या ट्रॅकवरील विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले असून आज दि.०२ जुन रोजी मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून लोणंद ते आदर्की या मार्गावरुन दोन्हीकडून घेतलेली चाचणी यशस्वी झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
आज मध्य रेल्वेकडून करण्यात आलेल्या विद्युतीकरणाची चाचणी यशस्वी झाल्याने या मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यांना यापुढील काळात विजेवर चालणारे इंजिन जोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सद्या पुणे ते मिरज या २८० किलोमीटर मार्गावरील जुन्या ट्रॅकचे संपूर्ण विद्युतीकरण पूर्ण झाले असून दूहेरीकरणाचे आणि नवीन ट्रॅकवरील विद्युतीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. दोन्ही ट्रॅक्सचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरुन रेल्वे वाहतूक वेगवान होणार असुन या मार्गावरील वाहतूकही पुढील काळात वाढणार आहे.
मध्य रेल्वेकडून याआधीच मुंबई ते कोल्हापूर धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस ४ जुन पासून विजेवर धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होता. आता त्याच बरोबर कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस आणि मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस यांनाही विजेवर चालणारे इंजिन जोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. विद्युतीकरणामुळे यापुढे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास अधिक वेगवान होणार असुन प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असल्याने या मार्गांच्या विद्युतीकरणाबद्दल प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.