महाराष्ट्राची खेलो इंडियात मुला-मुलींची कबड्डीत दोन्ही संघांची विजयी सलामी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जून २०२२ । मुंबई । चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या कबड्डी संघाने आंध्र प्रदेशचा तब्बल १९ गुणांनी तर मुलींच्या संघांने झारखंडचा ४५ गुणांनी उडवला धुव्वा हरियाणाच्या भूमीत विजयी सलामी देत आपले कौशल्य दाखवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी कबड्डीच्या मुला-मुलींच्या संघांतील खेळाडूंचे अभिनंदन केले.

महाराष्ट्राने मुलांच्या संघाने तब्बल ४८ गुण घेतले तर आंध्र प्रदेशला २९ गुणांपर्यंतच मजल मारता आली.ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉप्लेक्समध्ये हा सामना झाला. सुरूवातीला अटीतटीचा वाटणारा सामना महाराष्ट्राने एकतर्फी केला.महाराष्ट्राने पहिल्याच चढाईत एक गुण घेतला. डु ओर डाय रेडमध्येही गुण मिळवला. सुरूवातीपासूनच महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. परंतु नंतर आध्र प्रदेशने आक्रमकता वाढवून सामन्यात पुनरागमन केले. चार विरूद्ध पाच गुणांची आघाडी घेतली. त्यांनी चारगुणांची कमाई करीत महाराष्ट्राला ऑल आऊट केले. त्यामुळे सामना बारा विरूद्ध सहा असा फिरला. परंतु नंतर महाराष्ट्राचे खेळाडू आक्रमक झाले. आंध्र प्रदेशला ऑलआऊट केले. त्यामुळे त्यांचे पंधराविरूद्ध सोळा गुण झाले. अठराव्या मिनिटाला सतरा आणि सतरा अशी बरोबरी झाली. परंतु पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्रने तीन गुणांची आघाडी घेतली. त्यावेळी गुणफलकावर २० विरूद्ध १७ असे गुण होते. दुसऱ्या हाफ मध्ये महाराष्ट्र आणखीच आक्रमक झाला. त्यांनी चढाई आणि बचावातही उजवा खेळ केला. त्यामुळे आठ मिनिटे बाकी असताना जवळपास दुप्पट गुण मिळवले. धावफलक ४० विरूद्ध असा होता. शेवटी महाराष्ट्राने ४८ गुण मिळवत पहिलावहिला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विजय नोंदवला. आंध्र प्रदेशचे २९ गुण होते.

 

शिवम पठारे (अहमदनगर), पृथ्वीराज चव्हाण (कोल्हापूर) यांनी चढाईत नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांच्या बळावरच महाराष्ट्राला गुण मिळवता आले. दादासाहेब पुजारी, रोहन तुपारे, साईप्रसाद पाटील, जयेश महाजन यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. त्यामुळे संघाला भरभक्कम आघाडी घेता आली. सामन्यात आऊ आउट झाल्याने महाराष्ट्र सहा गुणांनी पिछाडीवर होता. परंतु नंतर आक्रमक खेळ करीत मुलांनी सफाईदार खेळ केला.

कबड्डीत झारखंडचा ४५ गुणांनी उडवला धुव्वा

चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्याच दिवशी कबड्डीत मुलांनंतर मुलींनी विजयी पतका फडकावत महाराष्ट्राचे नाव उंचावले. मुलींनी नेत्रदीपक कामगिरी करीत तब्बल ४५ गुणांनी झारखंडचा धुव्वा उडवला. ६० विरूद्ध १५ असा हा सामना झाला.
पंचकुलातील ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला. सामन्यात पहिल्या पाचच मिनिटांत मुलींनी झारखंडवर पाच-शून्य अशी गुणांची आघाडी घेत मानसिक दबाव टाकला. त्यामुळे झारखंडला सामन्यात कमबॅक करता आले नाही.
खेळाडूंनी प्रारंभीच सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकवला होता. पहिल्या हापमध्ये १५ गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या हापची दहा मिनिटे उरली असताना महाराष्ट्राच्या मुलींनी तब्बल ४५ गुण फलकावर लावले. त्यावेळी झारखंडचे अवघे १३ गुण होते. त्यामुळे केवळ सामन्याची औपचारिकता उरली होती. सामन्याला एक मिनिट उरला असताना पुन्हा एकदा झारखंडला ऑल आऊट केले. त्यामुळे गुणफलकावर लागले ६० गुण. झारखंडचे होते अवघे १५ गुण.
प्रशिक्षक गीता साखरे-कांबळे, सोनाली जाधव यांनी तर टीम व्यवस्थापक अनिल सातव, महेश खर्डेकर, ज्ञानेश्वर खुरांगे, सपोर्ट स्टाफ विजय खोकले, किशोर बोंडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवला. या सर्वांनी ठरवलेल्या प्लॅननुसार खेळाडूंनी सामन्यात कौशल्य दाखवले.

मैदानात जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष

महाराष्ट्राच्या मुलींनीही खेळात तरबेज असल्याचे दाखवून दिले. त्यांचा खेळ पाहून उपस्थित असलेल्या मराठी क्रीडाप्रेमींनी जल्लोषात जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा विजयी जयघोष केला. हरियानातील क्रीडाप्रेमींनी टाळ्या वाजवून मुलींना प्रोत्साहन दिले.

या मुली चमकल्या

चढाईत हरजीतसिंग संधू ११ गुण (मुंबई), ऋतुजा अवघडीने ८ गुण मिळवले. पकडीतही ती चमकली. यशिका पुजारीने पाच गुण मिळवले. निकिता लंगोटे आणि कोमल ससाणे यांनी नेत्रदीपक पकडी केल्या. मुस्काने लोखंडे हिनेही उत्कृष्ट बचाव केला. एकंदरीत सांघिक कामगिरीमुळे महाराष्ट्राला एकतर्फी विजय मिळवता आला.

मुलींचा संघ असा

हरजीतकौर संधू, शिवरजनी पाटील, आरती ससाणे, कोमल ससाणे, रिद्धी हडकर, हर्षदा पाटील, किरण तोडकर, मनिषा राठोड, निकिती लंगोटे, यशिका पुजारी, मुस्कान लोखंडे, ऋतुजा अवघडी.


Back to top button
Don`t copy text!