मनोहर जोशींच्या निधनाने सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड – श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

श्रीमंत रामराजे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्ष स्थापनेपासून पक्ष संघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अनेक मराठी तरुणांना उद्योग क्षेत्रातील संधींसाठी प्रशिक्षित केले. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात श्रीमंत रामराजे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!