दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । खंडाळा । सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील गट व गणाच्या जाहीर झालेल्या जिल्हा परिषद प्रारूप प्रभाग रचनेच्या यादीमध्ये खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेस असणा-या कण्हेरी हे गाव तालुक्याच्या पुर्वेस असणाऱ्या भादे या गटात दाखल केल्याच्या निषेधार्थ कण्हेरी ग्रामस्थ यापुढे होणाऱ्या निवडणूकीत मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे व गावात मतदान अधिकारी यास पाय ठेऊ देणार नसल्याचे निवेदन खंडाळा तहसीलदार यांना कण्हेरी ग्रामस्थांनी दिले आहे.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, सरपंच शिवाजी मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष मच्छिंद्र कुंभार, बाळासाहेब वीर, रमेश सुतार, शिवाजी पवार, महेश आमराळे, विजय चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी याबाबत लवकरच हरकती घेणार असुन याबाबत कण्हेरी ग्रामस्थ आमदार मकरंद पाटील यांची भेट घेऊन याकडे लक्ष घालण्याची विनंती करणार आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, कण्हेरी हे गाव खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेस 11 किलोमीटर असून शिरवळ व खंडाळा यापासून हे गाव 11 ते 15 किलोमीटर लांब असल्याने येथील जनता नेहमी खंडाळा व शिरवळ या बाजारपेठेत जोडले गेलेले आहे. यापूर्वी ते शिरवळ या गटामध्ये होते तर नंतर झालेल्या प्रभाग रचनेत खेड बुद्रुक या गटास हे गाव जोडण्यात आले. मात्र, आता कन्हेरीपासून जवळपास पंचवीस – तीस किलोमीटर लांब असणाऱ्या व टोकावर असणाऱ्या भादे गटास हे गाव जोडण्यात आले आहे. तरी या गावाची हेळसांड होत असून यापूर्वी असलेल्या शिरवळ किंवा खेड बुद्रुक या दोन्हीपैकी कोणत्याही गटात जोडण्यात यावे अन्यथा यापुढे ग्रामस्थ येणा-या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच सोसायटी व ग्रामसभा यांचा ठरावही निवेदनासोबत जोडण्यात आला असून यावर बहुसंख्य ग्रामस्थ यांच्या सहया आहेत, असे कण्हेरी सरपंच शिवाजी मोरे यांनी बोलताना स्पष्ट केले.