दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जबरी चोरी, दरोड्याची तयारी करणे, शिवीगाळ, दमदाटी करून विनयभंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोघांच्या टोळीला जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दोन वर्षांकरीता जिल्ह्यातून तडीपार केले आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्याची चौकशी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केली होती.
किरण रमेश आवारे (वय २०, रा. बिबी, ता. फलटण) व कुमार लालासो काकडे (वय २१, रा. बिबी, ता. फलटण) अशी तडीपार केलेल्या गुंडांची नावे आहेत.
वरील टोळीस हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, सातारा यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी या दोघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, पो.ह. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.ह. वैभव सूर्यवंशी, पो.ना. श्रीनाथ कदम यांनी पुरावे सादर केले.