दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
घरातील वृद्धांना अडगळीत टाकणारी अनेक कुटुंबे आज समाजात आढळून येत असताना फलटण शहरातील तेली समाजातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असणार्या श्रीमती गंगुबाई मोहनलाल तेली यांचा ९७ वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा करून ‘ज्येष्ठांच्या सन्माना’चा सामाजिक संदेश त्यांच्या कुटुंबीयांनी दिला. या कौटुंबिक सोहळ्यास फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शहरातील माजी नगरसेवक, शिक्षण, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट घेतलेल्या श्रीमती गंगुबाई तेली यांना आजही कामाची सवय आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या श्रीमती गंगुबाई तेली यांचा १ मुलगी, १ जावई, ३ मुले, ३ सुना, ७ नातवंडे, ६ नातसुना आणि एकूण १२ परतवंडे असा समृद्ध परिवार आहे.
आजकाल तरुणांचे, पुढार्यांचे वाढदिवस जल्लोषात होत असतात. मात्र, कुटुंबातील प्रत्येकाला आधारवड वाटणार्या श्रीमती गंगुबाई तेली यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी ९७ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची ‘तुला व सत्कार समारंभ’ पार पाडणार्या तेली कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘सजाई गार्डन’ येथे पार पडलेला हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्रीमती गंगुबाई तेली यांची मुले उदय तेली, गजानन तेली, राजेंद्र तेली, कन्या मीराबाई परदेशी, नातवंडे राहुल तेली, बाथ्री तेली समाज संघटनेचे अध्यक्ष विशाल तेली, विक्रम तेली, रोहन तेली, नकुल तेली, राकेश तेली यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी केले. युवा साहित्यिक सचिन गोसावी यांनी श्रीमती तेली यांचा आजवरचा जीवनपट शब्दबद्ध केला. कार्यक्रमास तेली समाज बांधवांसह फलटणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.