
फलटण तालुक्यातील दुष्काळी भागासाठी मोठी आनंदाची बातमी. धोम-बलकवडी प्रकल्पाची बंदिस्त पाईपलाईन निविदा प्रसिद्ध. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश. बरड, कोळकी, गुणवरे गटातील गावांना होणार फायदा. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. ३ फेब्रुवारी : फलटण तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळी परिस्थिती कायमस्वरूपी पुसून टाकण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले आहे. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या (Dhom Balkawadi Project) उजव्या कालव्याचे काम आता उघड्या चारीने न करता बंदिस्त पाईपलाईनद्वारे (PDN) करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा (E-Tender) शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील बरड, कोळकी आणि गुणवरे या जिल्हा परिषद गटांतील हजारो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
४०.६५ कोटींच्या कामाला गती
या कामासाठी सुमारे ४०.६५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. धोम-बलकवडी उजव्या कालव्याच्या कि.मी. १२८ ते १४७ मधील वितरण व्यवस्थेचे काम आता बंदिस्त नलिकेद्वारे होणार आहे. यामुळे पाण्याची होणारी गळती थांबणार असून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणे शक्य होणार आहे.
या गावांना मिळणार वरदान
या प्रकल्पामुळे पूर्व भागातील एकूण २३०५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील गावांचा समावेश आहे:
- दुधेबावी (१२४ हेक्टर), मिरढे (५६२ हेक्टर), नाईकबोमवाडी (१४१ हेक्टर).
- वडले (२१३ हेक्टर), शेरेशिंदेवाडी (१४६ हेक्टर), बरड (१०८ हेक्टर).
- कुरवली बु. (१८६ हेक्टर), जावली (५०२ हेक्टर) आणि आंदरूड (३२३ हेक्टर).
“शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवणारच…” : रणजितसिंह
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “धोम-बलकवडी प्रकल्पाच्या अंतर्गत बंदिस्त पाईपलाईनद्वारे (PDN) पोट कालवा मंजूर केल्याबद्दल राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मी विशेष आभार मानतो. या योजनेमुळे आता फलटण तालुक्यातील बरड, कोळकी व गुणवरे या पुर्व भागातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचण्याचे काम करता येणार आहे. फलटण तालुक्यातील इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
पूर्व भागातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.

