
दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे विद्यमान संचालक प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांना विश्व समता कलामंच लोवले, तालुका- संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी यांचा ‘राज्यस्तरीय विश्वसमता समाज भूषण पुरस्कार-२०२५’ जाहीर झाला आहे.
प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व संशोधनात्मक क्षेत्रातील कार्याचा निवड समितीने विचार करून हा पुरस्कार जाहीर केला आहे. प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी आजपर्यंत समाजप्रबोधन पर २००० व्याख्याने दिली असून अनेक शोधनिबंध, लेख, प्रस्तावना, कविता, समीक्षालेखन केले असून ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विषयाच्या पीएचडीचे गाईड म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या पीएचडी संशोधन प्रबंधांचे परीक्षक व रेफ्री म्हणून ते कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे ते माजी सदस्य असून अभ्यासक्रम निर्मिती व संपादन, लेखन यामध्ये त्यांनी बहुमोल कार्य व सहकार्य केलेले आहे.
हा पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असून रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सदर पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते लोवले, जिल्हा रत्नागिरी येथे प्रदान करण्यात येणार आहे.त्यांच्या या स्पृहणीय यशाबद्दल सर्व सामाजिक व अन्य स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.