
दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील प्राध्यापकांनी २०१३ साली ७१ दिवसांचा परीक्षा बहिष्कार आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या कालावधीतील पगार तत्कालीन शासनाने कपात केला होता. या विरोधात संघटनेने उच्च व सर्वोच्च न्यायालयातील लढाई जिंकून सुद्धा न्यायालयाच्या आदेशाची अद्यापही राज्य शासनाने पूर्णपणे अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अनेक प्राध्यापकांना लाभां पासून वंचित राहावे लागले आहे. तसेच परिक्षा बहिष्कार आंदोलनाला शासन आदेशामध्ये संप असा शब्दप्रयोग करून समाजाची दिशाभूल करून प्राध्यापकांबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विद्यापीठातील तीस हजार प्राध्यापक एमफुक्टो अर्थात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. – एमफुक्टो या संघटनेच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आज सातारा येथे शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये ही माहिती देण्यात आली. सुटा चे अध्यक्ष प्रा डॉ आर.के. चव्हाण , सातारा जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रा डॉ इला जोगी , शिवाजी विद्यापीठाचे सिनेटर डॉ मनोज गुजर , संघटनेचे जिल्हा सहकार्यवाह डॉ तानाजी कांबळे , उपाध्यक्ष डॉ ज्ञानदेव काळे व डॉ एन के मुल्ला हे पत्रकार परिषदेस उपस्थित होते. – महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी दि ४ फेब्रुवारी २०१३ ते १० मे २०१३ या ७१ दिवसांच्या कालावधीमध्ये परीक्षा बहिष्कार आंदोलन केले होते. या आंदोलन काळातील पगार तत्कालीन शासनाने कपात केला होता .या विरोधात संघटना उच्च व न्यायालयात गेली. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजूने निर्णय देऊनही राज्य शासनाने प्राध्यापकांना अडचणीत टाकणाऱ्या व शासनाला सोईच्या दुरुस्त्या करून शासन आदेश निर्गमित केला. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्यापैकी अनेक प्राध्यापक हे पदोन्नती , एम फिल व पीएचडी वेतनवाढी , इत्यादी लाभापासून वंचित राहिले आहेत. एमफुक्टो या संघटनेच्या वतीने परीक्षा बहिष्कार आंदोलन असे जाहीर करूनही शासन आदेशामध्ये संप असा शब्दप्रयोग करून समाजाची दिशाभूल करून प्राध्यापकां बाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप सुटा संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ आर के चव्हाण यांनी केला आहे. शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा एमफुक्टोने घेतलेला आहे. त्यांच्या आंदोलनाला धार यावी म्हणून त्यांनी आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे जाहीर केले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी व त्यांच्याशी प्राध्यापकांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर काळ्या फिती लावून काम करणे , उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढणे , विद्यापीठ कार्यालयावर मोर्चा काढून कुलगुरूंना हस्तक्षेप करण्यासाठी निवेदन सादर करणे , त्याचबरोबर विविध विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या कार्यालयावर सुद्धा मोर्चा काढण्यात येणार आहे. शेवटचा उपाय म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन दिले जाणार आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.