दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । आटपाडी । डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी निमित्त साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दि.११ व १२ जुलै,२०२२ रोजी होत असलेल्या सोहळ्याला प्रसारमाध्यमातील सर्व पत्रकारांनी आपले घरचे काम समजून सहकार्य करावे असे आवाहन खानापूर-आटपाडीचे माजी आमदार व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रआण्णा देशमुख यांनी केले.
आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.डॉ.शंकरराव खरात यांचे सुपुत्र डॉ.रविंद्र खरात, प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात,ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक,संपादक लक्ष्मणराव खटके, आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर पुजारी,सतीश भिंगे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
राजेंद्रअण्णा देशमुख बोलताना पुढे म्हणाले,आटपाडी तालुक्यामधील पाच साहित्यिकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या भागाचे नाव सातासमुद्रापलीकडे नेण्याचे काम केले आहे. या भागाला फार मोठी साहित्यिक परंपरा लाभलेली आहे. हे वर्ष डॉ.शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. यानिमित्ताने दि.११ व १२ जुलै, २०२२ रोजी दोन दिवसीय साहित्य संमेलन व जन्मशताब्दी सांगता कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमाला सातत्याने प्रसिद्धी देऊन प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियामधील सर्व पत्रकारांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या स्वतःचे घरचे काम समजून सहकार्य करावे.एवढ्या व्यापक प्रमाणात कार्यक्रम घेण्याचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे आर्थिक नियोजनामध्ये कमतरता राहणार आहे. पुढच्या वर्षी योग्य नियोजनाद्वारे माध्यमांना जाहिरातीद्वारे मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील, तरी यावर्षी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी डॉ.शंकरराव खरात साहित्य संमेलन,आटपाडी २०२२ निमित्त तयार करण्यात आलेल्या लोगोचे राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या हस्ते, डॉ.शंकरराव खरात यांचे सुपुत्र रविंद्र खरात,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सादिक खाटीक, लक्ष्मणराव खटके,किशोर पुजारी,सतिश भिंगे, सदाशिव पुकळे,भरत पाटील,दादासाहेब वाक्षे,अंकुश मुढे, इत्यादींनी मौलिक सूचना केल्या व या उपक्रमाला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केेली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी आभार मानले.
यावेळी माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब खरात,ज्येष्ठ साहित्यिक बा.ना.धांडोरे,भास्कर बंगाळे, सिताराम सावंत, पत्रकार मंजुषा पवार, प्रियांका पारसे व आदि पत्रकार,मान्यवर उपस्थित होते.