प्रवचने – नाम प्राणाबरोबर सांभाळावे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का ? जे करण्याने देवाची प्राप्ती होते, ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालविला तर कसे चालेल ? तुम्ही अभ्यास करता; अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे, तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे; चांगले धट्टेकट्टे पाय आहेत; ते जर देवाच्या प्राप्तीकरिता वापरले नाहीत, तर पाय नसलेले काय वाईट ? तुमच्यापुढे ब्रह्मानंदबुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता ? त्यांनी काय केले पाहा! त्यांनी नामस्मरणरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी, जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. आताच्या दिवसांत तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो; तरी ह्या वेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा; आणि त्या वेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा.

नाम व्यवहाराकरिता उपयोगांत आणू नका. नामस्मरण नामाकरताच करीत जा; आणि काही वेळ तरी नामांत घालविण्याचा निश्चय करा; म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरे समाधान तुम्हाला नामांतच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर, भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन `तुझ्या नामाचे प्रेम मला दे’ अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल.

वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो; म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते, ते समाधानच वासना हिरावून नेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून, सदासर्वकाळ नामात राहिले, तर हळूहळू तिचा अंत हो‍ऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील.

आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा.
पहिल्या पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल.


Back to top button
Don`t copy text!