प्रजासत्ताकदिनी भोंदवडे येथील शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा इशारा

भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांच्या अन्यायामुळे घेतला निर्णय


स्थैर्य, 25 जानेवारी, सातारा : भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांनी मोजणी बाबत हरकत घेऊनही दखल न घेतल्यामुळे भोंदवडे, तालुका सातारा येथील शेतकर्‍यांनी 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनी दोन अधिकार्‍यांना जबाबदार घरत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही कळविण्यात आले आहे. भोंदवडे, ता. सातारा येथील गट क्रमांक 303 च्या मोजणीबाबत हरकत असल्याने हणमंत मानसिंग माने राहणार भोंदवडे, तालुका सातारा यांनी व या गटाशेजारील
सर्व शेतकरी खातेदार यांनी या मोजणी वर लेखी आक्षेप नोंदवला होता. परंतू सातारा तालुका उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने तक्रारदार शेतकर्‍यांची दखल न घेतल्याने हणमंत मानसिंग माने व इतर शेतकर्‍यांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहना चा इशारा दिला आहे. याची दखल घेऊन गेले दोन दिवस भूकरमापक यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अंतिम नकाशा प्रमाणे हद्दी दाखवून शेतकरी बांधवाना न्याय देणे अपेक्षित होते. परंतू हेतुपुरस्सर सातारा उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने सर्व शेतकरी बांधवानी आपले आंदोलन अधिकतीव्र करत प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

आत्मदहन आंदोलनात काही बरे वाईट घडल्यास भुकरमापक वृषभ गिरी व प्रतापसिंह पाटील हे जबाबदार राहतील, असेही निवेदनात हणमंत माने यांनी म्हटले आहे. या गटातील शेतकरी महिला या विरपत्नी असून शासनाने नुकतीच विरपत्नीसाठी स्वामीत्व योजना देखील अंमलात आणली होती. परंतू भूमी अभिलेख विभाग त्याचीही अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. या आंदोलनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!