
दैनिक स्थैर्य | दि. ८ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटणकरांच्या गळ्यातील ताईत बनलेला ४ था ‘फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव’ प्रचंड उत्साहात, टाळ्या, वन्स मोअर्सच्या गजरात संपन्न झाला. या महोत्सवाला लाभलेली रेकॉर्ड ब्रेक ‘दर्दींची गर्दी’ हीसुद्धा यंदा चर्चेचा विषय ठरली.
या महोत्सवाचे मुधोजी हायस्कूल, फलटण येथील रंगमंचावर आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन फलटण एज्युकेश सोसायटीचे प्रशासन अधीकारी अरविंद निकम यांच्या यांच्या हस्ते झाले.
पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात सनई मंगलवादनाने झाली. सोलापूरच्या यशवंत जाधव आणि सहकार्यांनी ‘सुंदरी’ वादनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी अत्यंत सुरेल यमन राग पेश केला. त्यानंतर लोकप्रिय ‘गत’ आणि भजन सादर करून त्यांनी सत्राची सांगता केली. ग्रामीण भागातून आलेल्या आणि आकाशवाणीच्या ग्रेडेड आर्टिस्ट असलेल्या या गुणी कलाकाराचे फलटणकरांनी भरभरून कौतुक केले.
दुसर्या सत्रात टाळ्यांच्या गजरातच संदीप खरे आणि वैभव जोशी या जगप्रसिद्ध मराठी कवींच्या जोडीचे रंगमंचावर आगमन झाले. अपेक्षेप्रमाणे पहिल्या क्षणापासून त्यांनी जमलेल्या श्रोत्यांचा ताबा घेतला. राष्ट्रगीताच्या बाबतीतल्या डोळ्यात अंजन घालणार्या कवितेने सुरुवात करून नंतर समाज, प्रेम, कुटुंब, आणि संस्कार यांवर कधी गंभीर तर कधी नर्म विनोदी अंगाने भाष्य करणार्या कवितांच्या सादरीकरणाने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला.
काही विनोदी कविता आणि संवाद फलटणकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. निरनिराळे विषय घेत त्यांनी वातावरणनिर्मिती केली. तितकीच उत्स्फूर्त दाद टाळ्या, वन्समोअर आणि अगदी शिट्ट्यांचीही त्यांना शेवटपर्यंत मिळत गेली. मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळाल्याचा आनंदोत्सव फलटण शहरात यानिमित्ताने साजरा झाला.
दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात स्वरमंचावर आगमन झाले मंदार तळणीकर या तरुण प्रतिभावान गायकाचे. सुरुवात मधुवंती रागाने करून नंतर बागेश्री रागामध्ये ‘कर हा करी’ हे नाट्यगीत सादर करताना रागाचे सौंदर्य दाखवले. त्यांनी त्यानंतर ‘परब्रह्म निष्काम तोहा’ हे नितांतसुंदर भजन गायले. ‘माझे माहेर पंढरी’ या गाजलेल्या अभंगाने त्यांनी आपल्या सत्राची सांगता केली. त्यांना केदार तळणीकर यांनी तबल्यावर समर्थ साथ केली.
दुसर्या सत्रात डॉ. कल्याणी बोन्द्रे यांच्या अभ्यासपूर्ण गायनाने रंग भरले. ‘भिन्न षड्ज’ या रागामध्ये सुरुवात करून नंतर तराणा पेश केला. यानंतर ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाट्यपद, मन राम रंगी रंगले आणि कौशलेचा राम हे भजन, अबीर गुलाल हा अभंग सादर केला. “जो भजा हरिको” या भैरवीने त्यांनी कळस चढविला व दुसर्या सत्राची सांगता केली.
अरविंद बोन्द्रे यांचे विवेचन उपस्थित दर्दी श्रोते आणि संगीताचे विद्यार्थी या सर्वांसाठी ही मोठी पर्वणी ठरले. त्यांना अमित जोशी यांनी तबल्यावर आणि यांनी हार्मोनिअमवर सुंदर साथ केली. दोन्ही कलाकारांच्या स्वराविष्काराने जणू स्वरसाम्राज्य निर्माण केले. पखवाजावर रामदास माने, अविनाश जाधव आणि राहुल थोरे यांनी साथ केली तर जयसिंगराव भोसले यांनी हार्मोनिअम साथ केली.
आपली खासियत या महोत्सवाने अधोरेखित केली ती अमिता गोडबोले आणि सहकार्यांच्या “गीतरामायण -भरतनाट्यम नृत्यानुभव” या प्रयोगाने. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. एकाच मंचावर कधी अक्षरशः अयोध्या अवतरली तर कधी लंका जळाली. जटायू, हनुमान आदी पात्रांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. या अनोख्या आविष्काराला फलटणकर रसिकांनी भरभरून दाद दिली.
मुधोजी हायस्कूलचे पूर्ण मैदान श्रोत्यांनी भरून गेले होते. आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक संजय भुजबळ यांनी या महोत्सवाच्या निवेदनाची बाजू सांभाळली.
रसिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे यापुढे काम करण्यास बळ मिळाल्याची भावना कला प्रसारकच्या भाग्यश्री गोसावी व्यक्त केली.
फलटणकर रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे आणि श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त करीत पुढील वर्षाचे निमंत्रणदेखील दिले.
कला प्रसारक संस्थेच्या आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या संपूर्ण टीमने या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाकरिता घेतलेली मेहनत दिसून येत होती.