
स्थैर्य, सातारा, दि. 14 नोव्हेंबर : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा घातली आहे. त्यासाठी आयोगाने विविध वस्तूंचे प्रमाणित दर तक्ता दिला आहे. हे दरपत्रक जुन्या दरांप्रमाणेच असून, आताच्या वाढलेल्या महागाईच्या प्रमाणात हे दर असायला हवे होते. त्यामुळे या दरपत्रकानुसार खर्च बसविताना उमेदवारांची कसरत होणार आहे. निवडणूक आयोगाच्या दरपत्रकात चहा आठ रुपये, शाकाहारी जेवण 70, तर मांसाहारी जेवण 120 रुपये असे दर दिले आहेत. यासह इतर साहित्याचेही दर दिले आहेत; पण तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विधानसभा निवडणुकीवेळी केलेली दरसूची यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्यानुसार निवडणूक आयोग या खर्चासाठी विविध वस्तू, साधने, जेवणावळी इतर बाबींचे प्रमाणित दरपत्रक जाहीर करते. त्यानुसार उमेदवारांना दररोज आपला खर्च द्यावा लागतो; पण नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दरपत्रक वापरले जाणार आहे. यामध्ये सध्याच्या महागाईच्या तुलनेत विविध बाबींचे दर हे अल्प दाखवले आहेत. त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष होणारा जादा दराचा खर्च कमी करून बसविताना कसरत करावी लागणार आहे.
पालिकेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खर्चाचे प्रमाणित दरपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये साधा मंडप सात रुपये प्रति चौरस फूट, लाकडी मंच 30 रुपये चौरस फूट, प्लॅस्टिक खुर्ची सहा रुपये प्रतिखुर्ची, व्हीआयपी खुर्ची 80 रुपये प्रतिदिवस, टीपॉय 250 रुपये प्रतिदिवस, कार्यालयाचे भाडे एक ते तीन हजार रुपये प्रतिचौरस फूट प्रतिदिवस, गाद्या 50 रुपये प्रतिदिवस, फटाके माळा 350 ते 2500 रुपये, मैदान भाडे पाच हजार ते 50 हजार प्रतिदिन, मंगल कार्यालये शहरात तीन तासाला नऊ हजार, ग्रामीण भागात सहा हजार ते 18 हजार रुपये सहा ते 24 तास, गांधी टोपी दहा रुपये प्रतिनग, शाल 82 रुपये नग, कृत्रिम
फुले 150 रुपये चौरस फूट, थोर नेत्यांचे पुतळे शंभर रुपये प्रतिदिन असे आहे.
बॅण्ड पथकांचे भाडे हे प्रतिदिन 20 माणसे 10 हजार, पोवाडे पथक पाच हजार, शिंग वादनासाठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती तीनशे रुपये. झांजपथक भाडे दहा हजार, हलगी पथक तीन व्यक्ती 1500 रुपये असे आहे.
चहापान, अल्पोपाहार व जेवणखर्चामध्ये चहा आठ रुपये, 12 रुपये कॉफी, बिस्कीट पुडा दहा रुपये, थंड पेये 20 रुपये, पोहे, उपीट, शिरा 15 रुपये प्रतिप्लेट, वडापाव दहा रुपये, शाकाहारी जेवण 70 रुपये, मांसाहारी जेवण 120 रुपये असे दर असतील.सभेला व प्रचारासाठी माणसे आणण्यासाठी 24 तासांसाठी दुचाकींना 1100 रुपये, अॅटो रिक्षा 1300 रुपये, चारचाकी वाहने3300 रुपये, मोठी वाहने 6500 ते 15 हजार रुपये असे दर पत्रकात नमूद केले आहे.या दरपत्रकापेक्षा कितीतरी पट खर्च वाढलेला असताना निवडणूक आयोगाचे दर हे जुन्या दराप्रमाणे अल्पच आहेत.किमान सध्याच्या दराप्रमाणे यामध्ये बदल करावा, अशी अपेक्षा इच्छुक उमेदवारांतून व्यक्त होत आहे.
हेलिकॉप्टरचे असे आहे लॅण्डिंग भाडे…
निवडणुकीसाठी मोठ्या नेत्यांच्या सभा होतात. त्यासाठी नेत्यांना आणण्यासाठी होणार्या हेलिकॉप्टरच्या खर्चामध्ये लॅण्डिंग भाडे सातारा सैनिक स्कूल मैदान 20 हजार रुपये प्रति लॅण्डिंग, पार्किंग चार्जेस सहा तासाला पाच हजार रुपये, पूर्ण रात्र पार्किंग केल्यास दहा हजार रुपये. फलटण आणि कर्हाड हेलिकॉप्टर लॅण्डिंगसाठी सात हजार पाचशे रुपये, लॅण्डिंगसाठी तासाला 750 रुपये भाडे असणार आहे.
