दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । पुणे । श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जून रोजी आणि श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जून रोजी सुरू होत असून सोहळ्यात सहभागी वाहनांची तपासणी १६ ते १९ जून या कालावधीत करून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.
पालखी सोहळ्यात जड आणि प्रवासी वाहने सहभागी होत असतात. वाहन नादुरुस्त होऊन अपघात होऊ नये यासाठी वाहनाची पूर्वतपासणी महत्वाची आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने आळंदी रोड येथील चाचणी मैदान, दिवे येथील टेस्ट ट्रॅक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांच्या मोशी येथील कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
वाहन तपासणीच्यावेळी वाहनाची नोंदणी, कर, विमा, प्रदूषण नियंत्रण व योग्यता प्रमाणपत्र, परवाना व वाहतूक परवाना अशी सर्व कागदपत्रे मुदतीत असणे आवश्यक आहे. वाहनाची विनामुल्य तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दिवे कार्यालयात सकाळी ११.३० ते ४.३० आणि आळंदी रोड येथे सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ३ ते ५ यावेळेत तपासणी करण्यात येईल. वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अजित शिेंदे यांनी केले आहे.