दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२२ । सातारा । यावर्षीचा आषाढी (यात्रा) वारी सोहळा -२०२२ हा विक्रमी तर होईलच मात्र पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल ४० टक्के वाढ होण्याची शक्यता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी व्यक्त केली आहे.
आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर सातारा जिल्ह्यात सहा दिवस दिवस मुक्काम आहे. या अनुषंगाने पालखी सोहळ्याचे मुक्काम, विश्रांती, भोजन, रिंगण सोहळे आणि इतर परंपरागत ठिकाणांची पाहणी करण्यात आली. सातारा जिल्ह्यात लोणंद (ता. खंडाळा) येथील पाहणी नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, आरफळकर मालक संस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी माऊलींच्या पालखी मार्गाची पाहणी केली.
कोरोनाच्या र्निबंधामुळे वारी सोहळा हा दोन वर्ष काही मोजक्या लोकांमध्ये लालपरीतून (एसटीतून) जाऊन पार पडला होता. प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने निर्बन्ध हटवले आहेत. तब्बल दोन वर्षानंतर आषाढी पायी वारी होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, वारकरी तयारीला लागले आहे.
यंदा जेजुरीचा पालखी तळ बदलला आहे. जेजुरीत नवीन तळावर पालखी उतरणार असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अडचणीची पाहणी करण्यात आली. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर होत असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या बंधू भेटीची जागाही रस्त्याच्या कामात गेल्याने या जागेबाबत पर्यायांची माहिती घेतली. एकंदर पालखी मार्गावर यंदा वारकऱ्यांसाठी चार पदरी रास्ता बनल्याने भाविकांची चांगली सोय झाली असून मार्गात येणाऱ्या किरकोळ अडचणी प्रशासनाला सांगण्यात आल्याचे ढगे यांनी सांगितले.
मुक्काम तळ , रिंगणाच्या जागेवर मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. रस्त्याच्या कामामुळे शेकडो झाडे कापली गेल्याने वारकऱ्यांना दुपारी भोजनाच्या वेळी सावलीसाठी ग्रीन नेट बांधण्याची विनंती करणार असल्याचे ढगे यांनी सांगितले . याशिवाय यंदा माऊलीच्या पालखीसोबत ६ लाखांपेक्षा जास्त वारकरी चालत येणार असल्याने पाण्याचे अधिकचे टँकर आणि अधिकची आरोग्य,स्वच्छता व्यवस्था करण्याची मागणी देखील ढगे यांनी केली. सोहळ्याच्या प्रस्थानाला एक महिन्याचा वेळ असल्याने उरलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी ढगे यांनी केली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे. १० जुलैला आषाढी एकादशी आहे.
यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे. दि २८ जून रोजी पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून २८ व २९ जून लोणंद मुक्काम, ३० जूनला तरडगाव (ता फलटण)येथे पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा निंब येथे होणार असून नंतर मुक्काम, दि १ व २ जुलै फलटण येथे मुक्काम आहे. दि. ३ जुलै बरड (ता. फलटण) असे सहा पालखी सोहळ्याचे साताऱ्यातील मुक्काम संपवून दि. ४ जुलैला सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पालखी सोहळा सहा दिवस जिल्ह्यात राहणार असल्याने प्रशासनाला सातारा, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, कोकण परिसरातून होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने नियोजन करावे लागणार आहे.