निवडणूकीत प्रत्येक उमेदवारास १४ झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन बंधनकारक करणे गरजेचे : ना. श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । फलटण । स्वच्छता अभियान यशस्वी करताना प्रत्येक कुटुंबाकडे स्वच्छता गृह बंधनकारक करण्यात आले, लोकसंख्या नियंत्रणासाठी दोन पेक्षा अधिक मुले असणारे विविध योजनांचे लाभ, अगदी निवडणूकीसाठी अपात्र ठविण्यात आले त्याप्रमाणे आता प्रत्येकाने १४ झाडे लावणे व वाढविणे बंधनकारक करण्याची आवश्यकता महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे नमूद केली आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट आणि डॉ. महेश बर्वे, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित विविध विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, वन विभाग, नीरा उजवा कालवा विभाग यांच्या संयुक्त सहभागाने शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे ५ हेक्टर क्षेत्रावर पहिल्या टप्प्यात ४०० झाडे लावण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, त्यानंतर आयोजित सभेत मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

यावेळी आ. दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, तहसीलदार समीर यादव, वन विभागाचे जिल्हा प्रमुख मोहिते व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे, मुधोजी महाविद्यालय प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम व त्यांचे सहकारी, प्रा. सुधीर इंगळे आणि विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरवासीय नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासन विविध योजनांद्वारे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र त्याला लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्य जनता आणि प्रामुख्याने तरुण वर्गाने झोकून देवून सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे ठणकावून सांगत हे झाले नाही तर २०५० नंतर पृथ्वीतलावर जीवसृष्टी जगणे कठीण असल्याचे जाणकारांनी निदर्शनास आणून दिले आहे, अनेक मोठे देश त्यासाठी प्रयत्नशील असताना आपण किमान सातारा जिल्ह्यात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची चळवळ प्रभावी रीतीने राबवून यशस्वी करण्याचा निर्धार केल्याचे सांगत सर्वांनी साथ करावी असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
केवळ सातारा जिल्ह्यात ही चळवळ राबवून उपयोग असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करताना आपण विधी मंडळाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्नशील असून सर्व लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती देवून त्यांच्या मतदार संघात वृक्षारोपनाची ही चळवळ प्रभावी रीतीने राबविण्याचे आवाहन केले असल्याचे निदर्शनास आणून देत जळगाव जिल्ह्यात शिरपूर येथे तेथील उद्योगपती, माजी नगराध्यक्ष अमरीश पटेल यांनी सलग २० वर्षे प्रयत्न करुन २ लाख देशी झाडे लावून संपूर्ण शहर हरित पट्टा केल्यानंतर परिसरापेक्षा अधिक पाऊस या शहरात पडत असल्याचे, तेथील पर्यावरण पूर्णतः बदलल्याचे निदर्शनास आणून देत ती संकल्पना सातारा जिल्ह्यात राबवून यशस्वी करण्यासाठी साथ करण्याचे आवाहन यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांना केले.

यावेळी आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा वन अधिकारी मोहिते, डॉ. महेश बर्वे, प्रा. सुधीर इंगळे यांची समयोचीत भाषणे झाली.


Back to top button
Don`t copy text!