धुमाळवाडीच्या महेंद्र धुमाळ यांचे डाळिंब फळ पिकात यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२४ | फलटण |
सन १९८५ रोजी फळांचे गाव असलेल्या धुमाळवाडी गावात डाळिंब फळाची प्रथम लागवड करण्याचा मान महेंद्र धुमाळ यांचे वडील देवराव धुमाळ यांनी पटकावला होता. त्यांनी ०.३० हे. क्षेत्रावर गणेश जातीच्या डाळींबाची लागवड केली होती. आता हीच बाग महेंद्र धुमाळ यांना चांगले उत्पादन मिळवून देत आहे.

 

फळांचे गाव धुमाळवाडी गावचे प्रगतशील शेतकरी महेंद्र देवराव धुमाळ नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून डाळिंबाचे भरघोस उत्पादन घेत आहेत. त्यांनी २.०० हेक्टर क्षेत्रावरती डाळिंब आणि सीताफळ ०.४० वरती लागवड केली आहे. ज्वारी, बाजरी, मका यासारखी तृणधान्य पिके न घेता फळ पिकाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेऊन इतर शेतकर्‍यांना डाळिंब लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. धुमाळ यांना गेल्या वर्षी डाळिंबाला उच्चांकी दर १५० रुपये व कमीत कमी ११५ प्रति किलो मिळाला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब –

संपूर्ण डाळींब बागेवरती शेडनेट अच्छादन केले जाते. त्यामुळे सूर्यप्रकाशापासून डाळींब फळंपिकाचे संरक्षण होऊन उत्तम दर्जाचे उत्पादन घेतात. फळपिकावरील कीड व रोगाचे नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी ब्लोअरच्या साह्याने औषधाची फवारणी केली जाते.

डाळिंबासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला जात आहे. यामध्ये मडपं स्लरी देण्यासाठी आधुनिक जीवामृत टाकी, गांडूळ खत, हिरवळीचे पिके, जिवाणू खताचा वापर करून तसेच माती परीक्षणानुसार खत वापर तसेच कृषिक अ‍ॅपच्या माध्यमातून बागेला खते दिली जातात.

स्व. यशवंतराव चव्हाण कृषी व पशुपक्षी प्रदर्शनामध्ये सन २०२२-२०२३ ते २०२३-२०२४ मध्ये फळपीक स्पर्धेत त्यांचे डाळींब फळपीक प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले आहे. तसेच कृषी व औद्योगिक महोत्सव कराड २०२३-२०२४ मध्ये फळपीक स्पर्धेमध्ये डाळींब फळपीकाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२२ अंतर्गत शेतीनिष्ठ कृषी पुरस्कार देऊन धुमाळ यांचा गौरव करण्यात आला आहे.

परिसरातील शेतकर्‍यांना डाळिंब लागवडीविषयी मार्गदर्शन केल्यामुळे डाळिंबाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.

धुमाळ यांनी संपूर्ण शेती ठिबक सिंचनावरती केली आहे. कृषी विभागाच्या योजनेचा जोड घेऊन फळबाग लागवड केलेली आहे. संपूर्ण डाळिंब बाग तेल्या रोगमुक्त ठेवण्यात त्यांना यश मिळालेले आहे.

डाळिंब फळपिकात यशस्वी होण्यासाठी उपविभाग कृषि अधिकारी फलटण सुहास रनसिंग, तालुका कृषि अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, मंडल कृषि अधिकारी विडणी शहाजी शिंदे, कृषी पर्यवेक्षक अजित सोनवलकर, कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले असल्याचे ते सांगतात.

धुमाळ यांचे डाळिंब लागवडीचे प्लॉट पाहण्यासाठी शेतकरी वर्ग भेटी देऊन त्यांचे कौतुक करत आहेत आणि मार्गदर्शन घेऊन डाळींब फळबाग लागवड करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!