दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । पुणे । देशातील आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून देशसेवेसाठी जीवन समर्पित करणारे चारित्र्यवान आणि कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठने संयुक्तपणे सुरू केलेल्या स्पार्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, माजी सनदी अधिकारी प्रवीण दीक्षित, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, स्पार्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक धनंजय काळे, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे संचालक पुरूषोत्तम लोहिया, मार्गदर्शन केंद्राचे कार्यवाह महेश पोहनेरकर आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशसेवेसाठी विविध क्षेत्रात लोक कार्य करीत आहेत. एक श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी कर्तव्यनिष्ठ आणि कार्यप्रवण लोकांची गरज आहे. हीच गरज ओळखून समाजातील आर्थिक दुर्बल, उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने स्पार्क अकॅडमीची सुरुवात करण्यात आलेली आहे. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
देशात सुमारे एक लाख विद्यार्थी भारतीय प्रशासकीय, पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तयारी करतात. त्यापैकी साधारण ८०० विद्यार्थ्यांची निवड होते. उर्वरीत विद्यार्थ्यांनी निराश होवू नये. आपल्या प्रशासकीय सेवेसाठी केलेल्या तयारीचा आणि या अनुभवाचा समाजहितासाठी उपयोग करावा. स्पार्क या नावाप्रमाणेच येथील विद्यार्थी देशसेवेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत चांगले कार्य करून यश संपादन करतील, पुढील चार ते पाच वर्षात येथून जास्तीत जास्त अधिकारी निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी पोलीस महासंचालक श्री. दीक्षित म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला वाहून घेणारे सनदी अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलेले आहे. समाजातील सर्व घटकातील होतकरु विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी या मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करावा आणि अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
संचालक श्री.लोहिया म्हणाले, श्री मुकुंद भवन ट्रस्ट विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होवून आपले योगदान देत आहे. कोरोनाच्या काळात गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले. आळंदी, पंढरपूर, पैठण आदी ठिकाणी भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय करण्यात आलेली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.