दावोस आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । मुंबई । जागतिक आर्थिक परिषदेला आजपासून दावोस येथे सुरूवात झाली. या परिषदेसाठी  उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी विविध कंपन्यांसोबत गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या परिषदेद्वारे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

 याप्रसंगी  मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी  पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते.

देशाच्या ५ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र अग्रणी असून राज्याने एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने जगभरातून राजकीय नेते, धोरणकर्ते, उद्योगपती व तज्ज्ञ मंडळी दावोस, स्वित्झर्लंड येथे एकत्र आली आहे.

शिष्टमंडळाने आज इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली. राज्य पॅव्हेलियनमध्ये भेट घेतलेल्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये  पॅकेजिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जपानच्या पर्यावरण स्नेही सनटोरी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. तर रसायन क्षेत्रातील बहुराष्ट्रीय यू पी एल या कंपनीने रायगड जिल्ह्यात २५० एकर भूखंडावर गुंतवणूक करण्यास पसंती दिली असून त्यासंबधी चर्चा केली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्लोबल प्लास्टिक ॲक्शन पार्टनरशिप यांचे समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. २०१८ मध्ये एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!