दर्जेदार रस्ते व पुलांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । गोंदिया । जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अनेक कामे जवळपास पूर्णत्वास आली असून काही कामे सुरु झाली आहेत. त्यांचे भूमीपूजन आज करण्यात आले आहे. शहरातील पश्चिम भागातील रिंग रोडचे भूसंपादन सुरु आहे. तर मागणी झालेल्या मेडिकल कॉलेज जवळील रिंग रोडला आजच मंजूरी देत असून पुढील सहा महिन्यात त्याचे भूमीपूजन करण्यात येईल. मात्र राज्य शासनाने प्रस्तावित रिंग रोड परिसरात स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करावे. या दर्जेदार रस्ते व पुलांमुळे निश्चितच गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. असे प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आज 29 मे रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते आमगाव-गोंदिया या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम, गोंदिया-बालाघाट रस्त्यावरील बसस्थानका जवळील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डानपुलाचे बांधकाम व गोंदिया शहरातील हड्डीटोली रेल्वे क्रॉसिंगवर उड्डानपुलाचे एकूण 349.24 कोटीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल मेंढे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.परिणय फुले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार सर्वश्री राजकुमार बडोले, गोपालदास अग्रवाल, केशवराव मानकर, संजय पुराम, राजेंद्र जैन, रमेश कुथे, हेमंत पटले, भेरसिंह नागपुरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री. गडकरी म्हणाले की, आज तिरोडा-गोंदिया रस्त्यावरील 60 कोटीच्या उड्डानपुलाची घोषणा आपण करीत आहोत. जिल्ह्यात देवरी-आमगाव, गोरेगाव-गोंदिया रस्ता, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील वैनगंगा नदीवरील पुलाचे कामे जवळपास पुर्णत्वास आलेली आहेत. तर सौंदड येथे 130 कोटीच्या उड्डानपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. रावणवाडी ते बालाघाट टी पॉईंट काम येत्या सहा महिन्यात सुरु होईल. जिल्ह्यातील महामार्ग निर्मिती दरम्यान अनेक नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. यात जलसंवर्धनाची अनेक कामे झाली असून मोठ्या प्रमाणात तलावांची निर्मिती करण्यात आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यास पांगोली नदीचे पुनर्जीवन करण्यात येईल असेही ते म्हणाले. गोंदिया जिल्हा तांदूळ उत्पादक असून इथला तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. आता आलेल्या ड्रायपोर्टच्या मागणीनुसार रेल्वेच्या बाजुला असलेली 200 एकर जमीन दिल्यास सहा महिन्यात त्याला मंजूर करुन भूमीपूजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांनी तांदळापेक्षा तेलबियांचे उत्पादन घेतल्यास ते जास्त फायदयाचे होईल. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे वापर शासनाने हाती घेतले आहे. आता शेतकऱ्यांनी अन्नदातासह ऊर्जादाता व्हावे असे ते म्हणाले. लवकरच नागपूर ते गोंदिया मेट्रोचे काम सुरु होणार असून 1 तास 5 मिनिटात वातानुकुलीत प्रवास शक्य होणार आहे. नागपूर ते गोंदिया, गोंदिया ते चंद्रपूर व चंद्रपूर ते नागपूर अशी रिंग मेट्रो असेल. यामुळे रोजगारासाठी येणे-जाणे सुलभ होईल असेही त्यांनी सांगितले.

खासदार प्रफुल पटेल याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी रिंग रोड व ड्रायपोर्टची आवश्यकता आहे. ड्रायपोर्टसाठी राज्य सरकारकडून एमआयडीसीची जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले.

खासदार सुनिल मेंढे यांनी पांगोली नदी पुनर्जीवित करण्याची मागणी केली. सोबतच बिरसी विमानतळावरुन गोंदिया ते पुणे व मुंबई हवाई सेवा सुरु करावी व जिल्ह्यातील तांदूळ निर्यातीसाठी ड्रायपोर्टला मंजूरी देण्याची विनंती केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रस्ते परिवहन मंत्रालयाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव सिंग यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!