दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । अमरावती। ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषोपचार व कुशल तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली व यंत्रणेचा वापर करावा. धारणी व चिखलदरासारख्या दुर्गम भागातील रुग्णालयांमध्ये टेलिमेडिसीन प्रणाली सुरळीत व नियमीत करावी. तेथील नागरिकांना मुंबई, पुणे, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळवून द्यावेत त्याचप्रमाणे प्रायोगिक तत्वावर ग्रामीण भागात टेलिमेडिसीन सेवा सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.
जलसंपदा राज्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा शासकीय विश्राम गृहात स्वतंत्र बैठकांद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ सुरेंद्र ढोले, चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार, डॉ. रविंद्र चव्हाण, चुरणीचे वैद्यकीय अधीक्षक रामदेव वर्मा आदी उपस्थित होते.
योग्य नियोजन करण्यात यावे
राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, धारणी चिखलदरा बरोबरच लगतच्या अचलपुर, चांदुर बाजार, अकोट येथील रुग्णालयांतही अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली विकसीत करावी. रुग्णालयांमध्ये डिजीटल कक्षाची उभारणी करण्यात यावी. तांत्रीकदृष्ट्या या कक्षात सर्व सुविधांची निर्मिती करण्यात यावी. सर्व तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधुन दूरदृष्यप्रणालीद्वारे त्यांच्या उपलब्धतेच्या वेळापत्रकानुसार रुग्णांवर उपचार करण्यात यावे. याबाबतचे माहिती देणारे फलक रुग्णालयांमध्ये लावण्यात यावे. बालरोग, स्त्रीरोग, ह्दयरोग, यकृत, मेंदू रोग, मानसिक आजार, जुनाट आजार आदी आजांरावर उपचार करण्याऱ्या तज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात यावे. यासाठी सामाजीक उत्तरदायित्व निधीची मदत घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. टेलीमेडिसीन सेवा अव्याहत चालण्यासाठी इंटरनेट सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. तशी सुविधा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जलसंपदा राज्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. साबांविचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. चांदुर बाजार वळण रस्ता, बहिरम वळण रस्ता, अचलपुर बायपास व धारणी खामला रस्ता तसेच मोझरी बहिरम रस्ता निर्मितीच्या कामाची माहिती श्री. कडू यांनी घेतली. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.