दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । फलटण । ढवळ ता. फलटण येथील विशेष ग्रामसभेत अनिष्ट विधवा प्रथेच्या निर्मूलनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. असा ठराव करणारी हि सातारा जिल्ह्यातील दुसरी व फलटण तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने एक पुरोगामी पूल टाकत समाजातील विधवा माता भगिनींच्या वाट्याला येणारे अवहेलनेचे जिणे बंद व्हावे यासाठी ग्रामपंचायतीनी ठराव मजूर करावेत असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ढवळ गावचे सरपंच श्री. अंकुश लोखंडे यांनी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेने एकमताने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पती निधानानानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे तसेच पायातील जोडवी काढणे या गोष्टी यापुढे गावात होऊ दिल्या जाणार नाहीत असा निर्धार ग्रामस्थांनी एकमताने घेतला. या सभेसाठी गावातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपसरपंच श्री. तुकाराम बनकर, ग्रामपंचायत सदस्य रणजीत लोखंडे, मंदाताई गोफणे, नंदाताई नेरकर, विजयकुमार लोखंडे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, नारायण काळे, डॉ. एन. डी. लोखंडे, धैर्यशील लोखंडे, महिला समिती अध्यक्षा सौ. रंजणा करे, तृप्ती सोनावणे उपस्थित होत्या. श्री. नारायण काळे यांनी शासनाच्या परिपत्रकाचे वाचन केले. राम मसुगडे सर यांनी सूत्रसंचालन केले. या पुरोगामी निर्णयाबद्दल ढवळ ग्रामपंचायत सरपंच श्री. अंकुश लोखंडे व सर्व सदस्यांचे विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पं. स. सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.