डोंगरी महोत्सवाच्या नियोजनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी घेतला आढावा


दौलतनगर (मरळी) – डोंगरी महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेताना अधिकार्‍यांना सूचना देताना याशनी नागराजन व इतर.

स्थैर्य, 27 फेब्रुवारी, सातारा : महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार दौलतनगर (मरळी) येथे 2 ते 6 एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात येणार्‍या डोंगरी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी महोत्सवाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेत विविध विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी विविध पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महोत्सवाच्या मुख्य मैदानासह कृषी, पशुपक्षी व महिला बचत गटांच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या जागेची पाहणी करण्यात आली. स्थानिक शेतकरी, उद्योजक व महिला स्वयंसहायता गटांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन काटेकोर असावे, तसेच स्टॉलची मांडणी, पाणी व वीज सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांच्या आयोजनासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचीही पाहणी करण्यात आली. भजन, बॅण्ड, पोवाडे, लावणी स्पर्धा, तसेच फूड स्टॉल व फनफेअर परिसराची रचना सुयोग्य पद्धतीने करावी, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व आनंददायी वातावरणात कार्यक्रमांचा लाभ घेता येईल.याशिवाय, महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार्‍या कोयना नदीतील बोटींग सुविधेच्या ठिकाणाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, जीवनरक्षक साधनसामग्री, तसेच संबंधित विभागांकडून आवश्यक परवानग्या वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!