डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । मुंबई । सेवा शब्द उच्चारणे अतिशय सोपे आहे, परंतु सेवा करणे अतिशय कठीण काम आहे. समाज आपल्याला खूप काही देत असतो. त्यामुळे आपण समाजाचे फार मोठे देणे लागतो. यास्तव, डॉक्टरांनी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरातील किमान एक महिना किंवा एक पक्षमास देशासाठी दिल्यास त्यांना आत्मिक आनंद लाभेल व त्यांचा अनुभव देखील वाढेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

‘सेवांकुर भारत’ या संस्थेच्यावतीने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या हेतूने सारागूर, म्हैसूर ‘एक आठवडा देशासाठी’ या शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या ९५ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तसेच डॉक्टरांनी राज्यपाल कोश्यारी यांची नुकतीच राजभवन येथे भेट घेऊन आपले अनुभवकथन केले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा, डॉ. यतींद्र अष्टपुत्रे, डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. आरती आढे, महादेव पडवळ आदी उपस्थित होते.

सेवांकुर भारत या संस्थेने औरंगाबाद येथे सुरुवात करुन आज देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच डॉक्टरांचे संघटन झाल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आठवडी शिबीर आयोजित करून ‘सेवांकुर’च्या माध्यमातून समाजसेवेची भावना रुजवली जाते हे स्तुत्य कार्य असून सेवांकुरच्या कार्याचा वटवृक्ष व्हावा, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

डॉक्टरांनी डॉक्टरी पेशाचे ज्ञान घेताना उत्तम वक्ते, उत्तम शिक्षक तसेच उत्तम नेते देखील झाले पाहिजे असे सांगून उत्तम नेतृत्वगुण अंगी येण्यासाठी अधिक सेवा करणे आवश्यक असते, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी डॉ.आरती आढे, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. शालिवाहन गोपछडे, डॉ. रोहित गट्टेवार,
डॉ. प्रीती होळंबे तसेच शिबिरात सहभागी झालेल्या इतर वैद्यकीय विद्यार्थी व तज्ज्ञांनी शिबिरातील अनुभव कथन केले. राज्यपालांशी झालेल्या भेटीच्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या ६९ वैद्यकीय महाविद्यालयांमधील ९५ वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!