दैनिक स्थैर्य । दि. ०९ जून २०२२ । सातारा । जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नव्याने करण्यात आलेल्या गट आणि गण रचनेत ठोसेघर, ता. सातारा या गावाचा समावेश अंबवडे बुद्रुक गणामध्ये करण्यात आला आहे. हे संयुक्तिक नसून ठोसेघर गावचा कारी गणातच समावेश करावा, अशी मागणी सातारा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. कविता चव्हाण, माजी सदस्य शंकरआप्पा चव्हाण, ठोसेघरच्या सरपंच आनंदीबाई चव्हाण, उपसरपंच जयराम चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे आज केली.
निवेदनात म्हटले आहे, होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात जिल्हा प्रशासनाने गट आणि गण रचना केली आहे. त्यामध्ये कारी गटाअंतर्गत कारी आणि अंबवडे बुद्रुक गण यांची रचना करण्यात आली आहे. पूर्वी कारी गणात असणारे ठोसेघर या गावाचा समावेश अंबवडे बुद्रुक गणात करण्यात आला आहे. हे सयुक्तिक वाटत नाही. भौगोलिक व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर वाटत नाही.
ठोसेघर हे कारी गणात ठोसेघर पठार विभाग म्हणून केंद्रस्थानी आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय सातारा- गजवडी ते ठोसेघर, चाळकेवाडी, चिखली जांभे असा रस्ता असून तो दळणवळणासाठी उत्कृष्ट आहे. ठोसेघर आणि कास पठार परिसरातील काही गावे एकत्रित करणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. ठोसेघर गावाचा अंबवडे गणात समावेश करणे म्हणजे निवडणुकीसाठी अत्यंत अवघड आणि अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे ठोसेघर गावचा समावेश कारी गणातच करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.