दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । सातारा । नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालय प्रशासनाचा गहाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयातील मेडिकल बिले दिली जाणाऱ्या कक्ष क्र.22 मधून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावाचा एक चौकोनी व राजमुद्रा असलेला एक असे दोन शिक्के चोरीला गेल्याची फिर्याद चक्क एक वर्षानंतर देण्यात आली आहे. याप्रकरणी दीपाली प्रकाश झोरे (रा. तामजाईनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, जिल्हा रूग्णालयातील कक्ष क्र. 22 मध्ये जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले मंजूर करण्याचे काम केले जाते. त्यामुळे या विभागात सर्वसामान्य नागरिकांनी जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. तरीही या कक्षातून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावाचा एक चौकोनी व राजमुद्रा असलेला एक असे दोन शिक्के दि. 28 जुलै 2021 रोजी चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दि. 3 जून 2022 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटल्यावर जिल्हा रूग्णालय प्रशानसाच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या गुन्ह्याचा तपास हवालदार ठोंबरे करत आहेत.