दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । सातारा । तवेरा गाडीतून महामार्गावरून अवैधरित्या चोरटी दारू वहातुक करणाऱ्या वाहनावर बोरगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत १०७६ देशी दारूच्या बाटल्या असलेल्या १७ बॉक्ससह सुमारे २.९९ लाख मुद्देमाल जप्त केला.बुधवारी पहाटे आशियाई महामार्गावरील अतीत (ता.सातारा) गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांनी ही दमदार कारवाई केली.याप्रकरणी पोलिसांनी आमिर गुलाब मुलाणी (वय ३०, रा. देशमुखनगर, ता. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
बुधवारी पहाटे कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या आशियाई महामार्गावरून लाल रंगाच्या तवेरा गाडीतून आमिर गुलाब मुलाणी हा अवैधरित्या देशी दारूचे बॉक्स विक्रीसाठी वाहतूक करत असल्याची माहिती सपोनि डॉ. सागर वाघ यांना मिळाली.यावेळी सपोनि डॉ.सागर वाघ, हवालदार प्रवीण शिंदे, राहुल भोये,विशाल जाधव व एस.एन.जाधव यांनी महामार्गावरील अतीत येथील भुयारी पुलाजवळ सापळा रचला.
पहाटे ५.५४ च्या सुमारास सेवारस्त्याने येणारी लाल रंगाची तवेरा गाडी पोलिसांनी अडवली. तिची तपासणी केली असता गाडीत देशी दारूचे १७ बॉक्स आढळले. पोलिसांनी तवेरा गाडीसह देशी दारूचे बॉक्स जप्त करून आमिर मुलाणी याला ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोर्हाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलिसांनी ही कारवाई केली.