चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जून २०२२ । मुंबई । चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्र शासनाच्या एचएससीसी इंडिया लिमिटेड या सार्वजनिक उपक्रम कंपनीमार्फत महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचे काम सुरु असून येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात यावे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह एचएससीसीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, चंद्रपूर येथील बांधकामाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देण्यात आली असून यानुसार काम सुरु आहे. एचएससीसी कंपनीची टर्न की तत्वावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच पुढील 3 महिने यंत्रसामुग्री चाचणीसाठी (स्टॅबिलिटी) स्थिर कालावधी असा ठरविण्यात आला आहे. गेले काही दिवस कोविडमुळे बांधकाम कामावर परिणाम होत असला तरी आता मात्र बांधकामाच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. नेमून देण्यात आलेले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी एचएससीसीच्या प्रतिनिधी यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि उच्चाधिकारी समिती यांच्या सनियंत्रणात काम करण्याबाबतचे नियोजन करुन सप्टेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करावे, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!