दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । मुंबई । समग्र शिक्षण अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या वर्गातील सर्व मुली व अनुसूचित जाती/जमातीची सर्व मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेपासून सद्यस्थितीत खुल्या, ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि इतर समुदायातील वंचित राहणाऱ्या राज्यातील 12 लाख 60 हजार 744 विद्यार्थ्यांकरिता मोफत गणवेश उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.
याबाबत विधानपरिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्रीमती गायकवाड बोलत होत्या.
मोफत गणवेशापासून वंचित राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर वर्षी दोन गणवेशासाठी रु. 600 प्रमाणे प्रत्येक वर्षी अंदाजे 75.64 कोटी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार प्रस्ताव वित्त विभागास शालेय शिक्षण विभागामार्फत सादर करण्यात आलेला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिली.