कोळकीसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार; भाजपा नेते जयकुमार शिंदे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२५ | कोळकी | फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी गावासाठी असणारी पाणीपुरवठा योजनाही अत्यंत छोटी असून सदरील पाणीपुरवठा योजनेमध्ये संपूर्ण गावात योग्यरित्या पाण्याचे वाटप होत नाही. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोळकी गावासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून नवीन पाणीपुरवठा योजना करण्यात येणार असल्याची माहिती, कोळकी जिल्हा परिषद गटाचे भाजपा नेते जयकुमार शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली.

कोळकी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पाणीपुरवठा योजनेबाबत कोळकी मधील पदाधिकारी व जलसंपदा अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक बोलवण्यात आलेली होती. यावेळी स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, कोळकी जिल्हा परिषद गटाचे भाजपा नेते जयकुमार शिंदे, कोळकी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य सचिन रणवरे, कोळकी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य विकास नाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर, युवा नेते संजय देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कोळकी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे यांच्यासह कोळकी ग्रामपंचायतच्या आठ ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आगामी कोळकी गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ॲक्शन मोडवर आले असून येणाऱ्या काळामध्ये गावच्या विकासाचा रोड मॅप तयार करून गावचा संपूर्ण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही सुद्धा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेली आहे.

कोळकी गावच्या पुढच्या 25 ते 30 वर्षांची वाढीव लोकसंख्या लक्षात घेता, त्या पद्धतीने पाणीपुरवठा योजनेचे आखणी करण्यात यावी, यासोबतच कोळकी ग्रामस्थांना दररोज शुद्ध पाणी देण्यासाठी सदरील योजनेमध्ये प्रस्तावित करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिल्या.

गिरवी प्रादेशिक योजनेसाठी बहुतांश गावे ही संबंधित योजनेचे लाईट बिल भरत नसल्याने सदरील योजना योग्यरित्या चालू शकत नाही. त्यामुळे गिरवी प्रादेशिक योजनाही सोलार सिस्टिमवर करून व यासोबतच पूर्वीचे लाईट बिल असणारे शासनाच्या माध्यमातून माफ करण्यात यावे, अशी मागणी गिरवी प्रादेशिक योजनेचे अध्यक्ष महादेवराव गुंजवटे यांनी यावेळी केली.

कोळकी गावासाठी करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना व गिरवी प्रादेशिक योजनेचे सोलार सिस्टीम व प्रलंबित लाईट बिलाबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील हे शासन दरबारी पाठपुरावा करून नक्कीच यामध्ये यशस्वीरित्या तोडगा काढतील, असे आश्वासन यावेळी स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!