कोरोना काळानंतरही विकासाची गंगा अविरत सुरू : छगन भुजबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । नाशिक । कोरोना साथरोगाच्या काळात गेली दोन वर्षे विकास कामे मंदावली असली तरी विकासाची गंगा अविरतपणे सुरू आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणीपुरवठा योजना व इतर विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकर्पण प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी प्रांत अधिकारी ज्योती कावरे, तहसिलदार प्रमोद हिले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भांडेकर गटविकास अधिकारी अन्सार शेख आदी मान्यवरांसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना काळात आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने सर्वात जास्त खर्च हा औषधोपचार, ऑक्सिजन यंत्रणा, रेमडिसिव्हिर, पोलीस दल व शासकीय रूग्णालये सक्षमीकरणावर करण्यात आला. या काळात अन्नधान्य पुरवठाही रास्त धान्याच्या दुकानातून मुबलक प्रमाणात करण्यात आला आहे. ऑक्सीजनच्या बाबतीत आज जिल्हा स्वयंपूर्ण झाला असून ७०० मेट्रीक टन ऑक्सीजन साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. वेळेप्रसंगी इतर जिल्ह्यानाही ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य झाले आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत काम करणे (किंमत रूपये १६२ लक्ष), तलाठी कार्यालय भुमिपूजन करणे (किंमत रूपये ३० लक्ष), उंदिरवाडी अंचलगांव रस्ता दुरुस्ती भूमिपूजन (किंमत रूपये ५० लक्ष) याकामांचे यावेळी भूमीपूजन करण्यात आले तसेच १४ व्या वित्त आयोग व जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अंगणवाडी (१ व २) (किंमत रूपये १७ लक्ष), व्यायामशाळा (किंमत रूपये ७ लक्ष) इमारतींचे उद्घाटन, जिल्हा व क्रिडा विभाग अंतर्गत व्यायाम साहीत्य पुरविणे. (किंमत रूपये ११ लक्ष), आमदारांचा स्थानिक विकास निधी अंतर्गत उंदिरवाडी उत्तर पाटचारी रस्ता मजबुतीकरण (किंमत रूपये १५ लक्ष) या कामाचे लोकार्पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!