
कोरेगाव – कर्मवीर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. प्रमोद पांडव.
स्थैर्य, सातारा, दि. 25 सप्टेंबर : राष्ट्राच्या उभारणीत कर्मवीर अण्णांचे योगदान महत्त्वाचे असून अण्णांनी सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षण दिले. अण्णांनी नेहमी सत्याची कास धरली. वसतिगृहातील मुलांसाठी मूठ-मूठ धान्य गोळा करून मुलांना शिक्षण दिले. बाभळीची झाडे गावोगावी असतात, पण चंदनाचे झाड दुर्मिळ असते. कर्मवीर असे चंदनाचे झाड होते, त्यांची शिस्त व संस्कार यातूनच स्वतंत्र रयत संस्कृती घडली, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. प्रमोद एस. पांडव यांनी केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले कॉलेजमध्ये 138 व्या कर्मवीर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम हे होते.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाविद्यालय विकास समिती सदस्य सी. व्ही. बर्गे, माजी विद्यार्थी सुधाकर बर्गे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. आर. डांगे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री. ए. एस. अलेकरी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. व्ही. एस. कोष्टी, कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक प्रा. पी. एस. पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कर्मवीर जयंतीनिमित्त महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात, प्राचार्य डॉ. एल. डी. कदम म्हणाले, अण्णांवर सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. त्यांना अन्यायाची प्रचंड चीड होती. गुलामगिरी मुक्त माणूस त्यांना घडवायचा होता. त्यासाठी त्यांनी शैक्षणिक चळवळ उभी केली. त्यामुळे आजच्या पिढीने त्यांचा वारसा आणि वसा जपला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक व विज्ञान विभागचे उपप्राचार्य डॉ. एस. आर. डांगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. व्ही. एस. कोष्टी यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. एस. एस. पोतदार व प्रा. एस. बी. गोडसे यांनी केले, तर आभार कनिष्ठ विभाग समन्वयक प्रा. पी. एस. पलुसकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.