केंद्र शासनाच्या विविध अर्थ सहाय्याच्या योजनांचे धनादेशांचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२२ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत विविध कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र व धनादेशांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शेखर सिंह, बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर दिनकर संकपाळ, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक राजेंद्र चौधरी, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक युवराज पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.पाटील म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून सर्वसामान्य नागरिकांना उद्योग उभारणीसाठी व त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी  जास्तीत जास्त  कर्जाची प्रकरणे मंजूर करावीत. बचत गटांनी आता लोणचे, पापड या उद्योगातून बाहेर पडून बाजार पेठेत कोणता माल जास्त विकला जाईल याचा अभ्यास करुन उद्योग उभा करुन आपले ठरवलेले ध्येय प्राप्त करावे. बँकांनीही आलेली कर्जाची प्रकरणे जास्तीत जास्त मंजूर करुन कर्ज प्रकरण मंजुर करण्यात जिल्हा अग्रेसर राहिल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, सातारा जिल्हा हा देशाला दिशा देणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात बँकांचे मोठे जाळे आहे. जिल्ह्यात शेतकरी कृषी पर्यटनाकडे वळत आहे. या कृषी पर्यटन केंद्र उभाराणीसाठी आणि लहान उद्योग उभे करणाऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा करावा. शासनाच्या अर्थ सहाय्याच्या योजना नागरिकांना समजेल अशा भाषेत समजून सांगाव्या. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास बचत गटांच्या महिला, विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!