
दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा । सातार्यातील कूपर कॉलनीत बंद असणार्या बंगल्याचा कडी, कोयंडा तोडून 20 लाख रुपये किंमतीचे तब्बल 38 तोळे सोने लंपास झाल्याची तक्रार दाखल झाली. तक्रारदार हे एक्साईज विभागातील निवृत्त अधिकारी जयंत दत्तात्रय वारेगावकर (वय 73) आहेत. दरम्यान, सातार्यातील वाढत्या चोर्याप्रकरणी पोलिसांची झाडाझडती घेण्यात आली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना दि. 27 ते 29 मे या कालावधीत घडली आहे. तक्रारदार हे सातार्यातील बंगल्यामध्ये सध्या एकटे राहत आहेत.कामानिमित्त ते पुण्याला गेले होते. यावेळी चोरट्यांनी बंद घर पाहून लॉकर व ड्रॉव्हरमधून 380 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 40 हजार रुपये असा एकूण 19 लाख 39 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना समोर आल्यानंतर परिसर हादरुन गेला. या घटनेनंतर तक्रारदार यांनी तात्काळ त्यांनी सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर चोरी झालेले सोने व रक्कम ऐकून पोलिसही हादरुन गेले. यानंतर पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पाचारण केले. वरीष्ठ पोलिस अधिकार्यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर रविवारी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.